नवी दिल्ली : सर्वाधिक आयकर भरणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. एकटा महाराष्ट्र हा यादीत समाविष्ट असलेल्या चार राज्यांच्या एकूण आयकरापेक्षा जास्त कर भरतो. तर महाराष्ट्र आणि दिल्ली एकत्रित देशातील अर्धा आयकर भरतात. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने जारी केलेल्या आयकर आकड्यांमधून ही बाब समोर आली आहे.

यावरुन स्पष्ट समजतं की, ज्या राज्यात जास्त कंपन्या आहेत, तिथून सर्वाधिक कर जमा होतो. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये आयकर वसुलीत वाढीच्या दृष्टीने पूर्वोत्तर राज्यांनी उर्वरित भारतावर बाजी मारली आहे. याशिवाय आयकराबाबत इतरही अनेक रंजक गोष्टी समोर आल्या आहेत, त्यावर एक नजर टाकूया.

2017-18 मध्ये सर्वाधिक आयकर वसुली झालेली पाच राज्यं
महाराष्ट्र - 38.3%
दिल्ली - 13.7%
कर्नाटक - 10.1%
तामिळनाडू - 6.7%
गुजरात - 4.5%

आयकर वसुली वाढीच्या दृष्टीने सर्वात पुढे असलेली पूर्वोत्तर पाच राज्यं
मिझोराम - 41%
नागालँड - 32.1%
सिक्कीम - 26%
त्रिपुरा - 16.7%
मेघालय - 12.7%

एकूण महसुलात प्रत्यक्ष कराचं योगदान
2001-01 : 36.3%
2017-18 : 52.3%

ITR फाईल करणाऱ्याच्या संख्येत 65% वाढ
2013-14 : 3.3 कोटी
2017-18 : 5.2 कोटी

एकूण करदात्यांच्या संख्येत 60% वाढ
आर्थिक वर्ष 2013-14 : 88,649
आर्थिक वर्ष 2017-18 : 1,40,139

एक कोटींपेक्षा जास्त उत्पन्न घोषित करणारे वैयक्तिक करदाते
आर्थिक वर्ष 2013-14 : 48,416
आर्थिक वर्ष 2016-17 : 81,344

रंजक गोष्टी

1. सर्वाधिक आयकर रिटर्नमध्ये पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न घोषित केलं जातं आणि याच वर्गातून सर्वात जास्त कर वसुली होते.

2. दोन कोटी वैयक्तिक करदाते रिटर्न फाईल करतात, पण एक रुपयाही कर देत नाहीत.

3. दोन कोटी लोक कर देतात, पण रिटर्न फाईल करत नाहीत.

4. केवळ चार भारतीयच वर्षभरात शंभर कोटींपेक्षा जास्त आयकर भरतात.

5. 93% वैयक्तिक करदाते वार्षिक दीड लाखांपेक्षा कमी आयकर भरतात.

6. आर्थिक वर्ष 2013-14 पासून 2017-18 पर्यंतच्या चार वर्षात फाईल केलेल्या इन्कम टॅक्स रिटर्न्सची संख्या 3.31 कोटी होती. ती 80 टक्क्यांनी वाढून 6.85 कोटी झाली आहे.

7. 2014-15 पासून 2017-18 दरम्यान एक कोटींपेक्षा जास्त उत्पन्न घोषित करणाऱ्या एकूण करदात्यांची संख्या 60 टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये कंपन्या, छोटे व्यवसाय, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) सर्व प्रकारचे करदाते सामील आहेत.

8. एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्नाची घोषणा करणाऱ्या वैयक्तिक करदात्यांची संख्या चार वर्षात 68 टक्क्यांनी वाढली आहे.

9. महाराष्ट्र आणि दिल्लीचं योगदान पहिल्यापेक्षा कमी होत असून, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातच्या वाट्यात वाढ होत आहे.

10. मोठ्या राज्यांमध्ये राजस्थान असं एक राज्य आहे, जिथली करवसुली सात वर्षांत तिप्पटीपेक्षा जास्त वाढली आहे.

11. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश या राज्याचं आयकर वसुलीत केवळ 2.3 टक्केच योगदान आहे.