ग्रेनेड झेलून 20 सहकाऱ्यांचा जीव वाचवणारा जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम | 22 Oct 2018 11:15 PM (IST)
मणिपूरमध्ये मार्केटमधून सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या गाडीवर नक्षलवाद्यांनी ग्रेनेड फेकून हल्ला केला होता.
बेळगाव : नक्षलवाद्यांनी फेकलेला ग्रेनेड झेलून 20 सहकारी सीआरपीएफ जवानांचे प्राण वाचवणाऱ्या वीर योद्ध्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. मणिपूरमध्ये मार्केटमधून सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या गाडीवर नक्षलवाद्यांनी ग्रेनेड फेकून हल्ला केला होता. वीस जणांचा जीव वाचवून आपल्या प्राणाची आहुती देणारा गोकाकचा सुपुत्र शहीद जवान उमेश हेलवारे याच्यावर सोमवारी शासकीय वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. मणिपूरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ गाडीवर टाकलेला ग्रेनेड झेलून जवान उमेश हेलवारे यांनी गाडीबाहेर उडी मारली आणि वीस जवानांचे प्राण वाचवले. ग्रेनेड गाडीत फुटला असता, तर वीस जवान दगावले असते, मात्र उमेश हेलवारेंनी जीवाची पर्वा न करता ग्रेनाईड हल्ला बाहेरच्या बाहेर थोपवून लावला. गेल्या चार वर्षांपासून ते मणिपूर भागात सेवा बजावत होते. वीरमरण प्राप्त झाल्यावर खास विमानाने सोमवारी सकाळी त्यांचं पार्थिव बेळगावला आणण्यात आलं. शासकीय इतमामात गोकाकमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.