मुंबई : देशात सलग दहाव्या दिवशी  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर राहिल्याचं दिसून आलंय. गेल्या काही दिवसातील इंधनाच्या दरात झालेली वाढ पाहता त्या कधीही शंभरी पार करु शकतात अशी धाकधूक सामान्यांना होती. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताना दिसत होत्या. बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ न झाल्याने सामान्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 97.57 रुपये इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 88.60 रुपये इतकी आहे. दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे 31.17 आणि 81.47  रुपये इतकी आहे. 


देशात 1 जुलै 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात. 


वर्धापनदिनी मनसेकडून पेट्रोल-डिझेलवर 15 रुपयांची सूट, मुंबईच्या वडाळ्यात मनसेचा अनोखा उपक्रम


सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. आता यावरच कर थांबत नाही. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो.


जगातल्या तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या OPEC देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या ज्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येतंय तेवढाच उत्पादनाचा स्तर राखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमती लवकरच कमी होतील हा आशाही धुसर झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या कच्च्या तेलाच्या किंमती वाढीचा परिणाम हा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढीवर होण्याची शक्यता आहे.


Maharashtra Budget 2021 : मद्यप्रेमींना झटका, दारु महागणार? मद्यावरील व्हॅट वाढवला