आज पुन्हा एकदा हे दोन्ही नेते माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सांगितले की, "उद्या मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होईल" त्यामुळे सत्तास्थापनेसंबंधीची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आली असल्याचे बोलले जात आहे. उद्या (22 नोव्हेंबर)संध्याकाळी 4 वाजता काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांची निवडदेखील केली जाणार आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात पर्यायी सरकार बनवण्यासाठी कालपासून प्रयत्न सुरु आहेत. आमच्या दिल्लीतल्या चर्चा आता आटोपल्या आहेत. सत्तास्थापन करण्यावर आमचे एकमत झाले आहे. उद्या आम्ही मुंबईला जाणार आहोत. मुंबईत आम्ही आमच्या आघाडीमधील मित्रपक्षांशी चर्चा करणार आहोत. आतापर्यंतच्या चर्चेची त्यांना माहिती देऊ.
त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेसोबत चर्चा करतील. यावेळी तीन पक्षांची आघाडी करण्याबाबतच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. त्या चर्चेनंतरच आम्ही आघाडीबाबतची अथवा चर्चेत काय झालं याबाबतची घोषणा करु. त्यानंतरच पुढील कार्यवाही होईल. जसे की, राज्यपालांना भेटणे, सत्तास्थापनेचा दावा करणे, इत्यादी.
आमचा किमान समान कार्यक्रम, सत्तास्थापन कधी करणार? मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल? मंत्रीमंडळात कोण कोण असणार? याबाबतची माहिती आम्ही शिवसेनेसोबतच्या चर्चेनंतरच जाहीर करु, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
पाहा काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?