नवी दिल्ली : नेहमी वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयात महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञा यांची संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या समितीचे नेतृत्व करत आहेत.


या समितीत एकूण 21 सदस्य आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, फारुख अब्दुल्ला, ए. राजा, जे.पी. नड्डा, मीनाक्षी लेखी यांचा समावेश आहे. समितीत देशभरातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचंही नाव समाविष्ट करण्यात आले आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या भोपाळ मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा या आरोपी आहेत. राष्ट्रीय तपस पथकाने (एनआयए) प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधातील मकोकाचे आरोप फेटाळले आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रज्ञा ठाकूर यांना जामीन मिळाला आहे.

प्रज्ञा ठाकूर यांना भाजपने लोकसभेचे तिकीट दिल्यानंतर प्रचारादरम्यान त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त आहे आणि सदैव राहील, असं वक्तव्य त्यांनी गोंधळ निर्माण केला होता. त्याअगोदर त्यांनी 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस हेमंत करकरेंबंद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. 'हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला.' असे वक्तव्य त्यांनी केले होते. ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना निवडणूक आयोगाने नोटीसदेखील बजावली होती.

निवडून आल्यानंतरही साध्वी प्रज्ञा यांची वादग्रस्त वक्तव्ये थांबलेली नाहीत. तुमची स्वच्छतागृहं आणि गटारं साफ करण्यासाठी मी खासदार झालेले नाही, असे प्रज्ञा यांनी नागरिकांना खडसावले होते. या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली. त्यानंतरही त्या त्यांच्या वक्तव्यावर ठाम होत्या. ठाकूर म्हणाल्या की, 'आम्ही गटारं साफ करण्यासाठी नाही आहोत. ठीक आहे ना? आम्ही तुमचं शौचालय स्वच्छ करण्यासाठी अजिबातच नाही निवडून आलो. आम्ही जे काम करण्यासाठी निवडलो गेलो आहोत, ते काम आम्ही इमानदारीने करु. असं आम्ही पूर्वीही म्हणत होतो. आजही त्यावर ठाम आहोत आणि उद्याही आमचं म्हणणं तेच असेल'

कोण आहे साध्वी प्रज्ञा?
संपूर्ण नाव - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर
मूळ गाव - मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील कछवाहा
रा. स्व. संघाच्या संपर्कात आल्यानंतर तिने संन्यास घेतला. ती अभिनव भारत संघटनेची सदस्य आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात ती आरोपी होती. स्फोटाच्या ठिकाणी तिची बाईक सापडली होती. त्यानंतर तिच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. 2016 मध्ये एनआयएने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये प्रज्ञा सिंहला दोषमुक्त ठरवण्यात आलं होतं. तिच्यावरील मोक्का हटवण्यात आला आणि प्रज्ञा ठाकूरवर करकरे यांनी केलेली कारवाई सुसंगत नव्हती, असं सांगण्यात आलं.
संघ प्रचारक आणि समझोता एक्स्प्रेस स्फोटातील आरोपी सुनिल जोशी हत्याप्रकरणातही साध्वी प्रज्ञाचं नाव होतं. पण 2017 मध्ये मध्य प्रदेशातल्या देवास कोर्टाने प्रज्ञाला सुनील जोशी हत्येप्रकरणी निर्दोष मुक्त केलं होतं.