Supreme Court on Maharashtra Political Crisis : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकार दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या निर्देशाविरोधात याचिका दाखल केली. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं तातडीनं याप्रकरणी सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
अभिषेक मनु सिंघवी यांनी अशा प्रकारे तातडीनं बहुमत चाचणी बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. यानंतर दोन्ही न्यायाधीशांनी आपापसात चर्चा केली. कोर्टानं म्हटलं की याविषयीची आम्हाला कागदपत्रं द्यावीत. त्यावर आम्ही आज चार वाजेपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करु, असं सिंघवी यांनी म्हटलं. आमच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. त्यानंतर सुनावणी झाली तर आमचं म्हणणं निरर्थक ठरेल, असं सिंघवी यांनी म्हटलं. यावर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला की, बहुमताच्या चाचणीसाठी अधिवेशन बोलावणं हा राज्यपालांचा अधिकार आहे, त्यात कुणी ढवळाढवळ करु शकत नाही, असं शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी म्हटलं. राज्यपालाच्या अधिकारात हस्तक्षेप करणं चुकीचं आहे, असंही त्यांनी म्हटलं.
यावर जस्टीस सूर्यकांत यांनी आजच या प्रकरणी सुनावणी होईल. दुपारी तीन वाजेपर्यंत कागदपत्रं तयार ठेवा, असं कोर्टानं म्हटलं आहे. संध्याकाळी पाच वाजता यावर सुनावणी होईल, असंही कोर्टानं म्हटलं आहे.
राज्यपालांकडून सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश
भाजपने अविश्वासदर्शक ठरावाची मागणी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार न्यायालयाची दारं ठोठावलं. भाजपच्या मागणीनंतर राज्यपालांनी आज सरकारला बहुमत सिद्ध करण्याची तारीख दिली. ती देखील उद्याची म्हणजे 30 जून. सोमवारी झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्येही बहुमत चाचणीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या सोळा आमदारांवर कारवाई करू नये, असा आदेश कोर्टाने दिला होता. दरम्यानच्या काळात बहुमत चाचणीची मागणी केली तर काय करायचं असा प्रश्न सरकारच्या वकीलांनी कोर्टात उपस्थित केला होता. त्यावर तुम्ही या, आम्ही सुनावणीला तयार आहोत असं कोर्टानं सांगितलं होतं. याचाच आधार घेत महाविकास आघाडी सरकार म्हणजे शिवसेना आज कोर्टात पोहोचली.
इतर महत्वाच्या बातम्या