Maharashtra Floor Test: मंगळवारी रात्री भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. मंगळवारी, भाजपच्या गोटातून मोठ्या घडामोडी घडल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर रात्री मुंबईत राज्यपालांची त्यांनी भेट घेतली. सरकारने बहुमत गमावले असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपालांना एक ई-मेलच्या माध्यमातून बंडखोर आमदारांनी पत्र दिलं आहे. शिवसेनेचे 39 आमदारांनी बंडखोरी केली असून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत रहायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निकालांचा अभ्यास करुन राज्यपाल त्यांना योग्य ते निर्देश देतील अशी आशा आम्हाला आहे."
एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत. एकनाथ शिंदे यांनीच गुवाहाटीमध्ये ही माहिती दिली.
शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. सूरतमध्ये आपल्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सूरतमधून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सगळे आमदार गुवाहाटीच्या दिशेनं रवाना झाले. मग तिथून ते हे सगळे आमदार आसाममधल्या गुवाहाटीत पोहोचले.