नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या दिल्लीतील तुघलक लेन या निवासस्थानी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक सुरु आहे. विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खलबतं सुरु असल्याची शक्यता आहे.
बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीला वर्षा गायकवाड, राजीव सातव, केसी वेणुगोपाल, रजनी पाटील हे देखील उपस्थित आहेत.
राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षपदी न राहण्याची भूमिका घेतली आहे. मात्र राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये, अशी काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. यासाठी काँग्रेसच्या अनेक प्रदेशाध्यक्षांनी आणि जवळपास 120 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
काँग्रेसचे किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधींच्या समर्थनार्थ त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचललं आहे. लोकसभेतील पराभवाची जबाबदारी घेत नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस सचिव आणि काँग्रेसचे राजस्थान सह-प्रभारी तरुण कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.