Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana)  प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांची भेट घेतली. यावेळी शेट्टींनी शेती प्रश्नाच्या विविध मुद्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. तसेच इथेनॅालच्या किंमत (Ethanol Price) वाढीसह साखर निर्यातीच्या (Sugar Export) धोरणावर केंद्र सरकारनं मार्ग काढावा अशी मागणी देखील राजू शेट्टींनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.  


विविध मुद्यांवर चर्चा


नितिन गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी राजू शेट्टींनी त्यांची भेट घेतली.  साखर उद्योगाबरोबर, राष्ट्रीय महामार्गांची सुरु असलेली कामं, राज्यातील राजकीय घडामोडी, देशामध्ये ऊस उत्पादक शेतकरी वगळता केंद्र सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन, कापूस, कांदा, धान उत्पादक शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी संकटात आर्थिक संकटात सापडले आहेत. नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नामुळं केंद्र सरकारनं इथेनॅालचे धोरण स्थिर केल्यामुळं साखर कारखानदारांना थोडे चांगले दिवस आल्याचे शेट्टी म्हणाले.  


साखरेचा बाजारभाव 38 रुपये करावा


देशातील साखर उद्योग स्थिर करण्यासाठी साखरेचा बाजारातील किमान बाजारभाव 38 रुपये करावा. तसेच इथेनॅालच्या किंमतीत वाढ करावी. साखर निर्यातीच्या धोरणावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी राजू शेट्टींनी गडकरी यांच्याकडे केली. याबाबत केंद्र सरकारने तातडीने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे शेट्टी म्हणाले. तसेच सांगली-कोल्हापूर बायपास मार्गे चौपदरीकरण करताना मुरमाचा भराव टाकू नये. अन्यथा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गावे महापुराच्या पूर्ण विळख्यात जातील असे शेट्टी म्हणाले. त्यामुळं सदर रस्ता करताना पिलरचा वापर करुन रस्ता करावा,  अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.


पामतेल आयातीचा दरावर मोठा परिणाम


वाढलेल्या महागाईमुळं ऊसाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यंदा एफ.आर. पी पेक्षा वाढीव दर दिल्याशिवाय हा उत्पादन खर्च निघणे अशक्य असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. यासाठी साखरेचा बाजारातील किमान दर 38 रुपये करुन साखर निर्यात धोरण निश्चित करण्याची गरज आहे. देशात पामतेल मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. याचा विपरीत परिणाम सोयाबिनच्या दरावर होत असल्याचे शेट्टी म्हणाले. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या सोयाबिन उत्पादीत होत असलेल्या भागात होत आहेत. तसेच सोयाबिनच्या पेंडीच्या आयातीवर देखील निर्बंध आणणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत राजू शेट्टींनी व्यक्त केले. याबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी - कोल्हापूर ते अंकली व पुणे- कागल या महामार्गातील रस्त्याच्या कामातील त्रुटीबाबत व सुरू होत असलेल्या कामामुळे संभाव्य महापुराच्या परिस्थिती बाबत सविस्तर चर्चा देखील यावेळी केली. तसेच अंकली कोल्हापूर बायपास मार्गे चौपदरीकरण करताना भराव न टाकता पिलर उभे करुन रस्ते तयार केले जातील, असे आश्वासन देखील राजू शेट्टींनी दिले.


महत्त्वाच्या बातम्या:


Prithviraj Chavan on Raju Shetti: राजू शेट्टींना महाविकास आघाडीत येण्यासाठी साकडे? पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?