Chota Amarnath Yatra 2023 : उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील 'छोटा अमरनाथ यात्रा' फार प्रसिद्ध आहे. ही यात्रा आता तब्बल 9 वर्षांनंतर पुन्हा सुरु होणार आहे. छोटा अमरनाथ यात्रा येत्या 31 ऑगस्टपासून सर्व भक्तांसाठी सुरू करण्यात येणार आहे. 'छोटा महाराजा यात्रा' 2013 मध्ये पंचवीस वर्षांच्या कालावधीनंतर सुरू झाली होती. पण, 2014 नंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही यात्रा पुन्हा थांबवण्यात आली.


बांदीपूरच्या अरिन खोऱ्यातील घनदाट जंगलात डोंगराच्या माथ्यावर वसलेले, महा दानेश्वर मंदिर, ज्याला 'छोटा अमरनाथ' असेही म्हटले जाते. या ठिकाणी नैसर्गिकरित्या तयार केलेले बर्फाचे शिवलिंग आहे. वरून पाण्याचे थेंब हळूहळू या शिवलिंगावर पडतात. या गुहेच्या यात्रेला फक्त एक दिवस लागतो. गुहेच्या आतमध्ये अरुंद जागा आहे ज्यामध्ये फक्त 7 ते 8 लोक सामावू शकतात.


'छोटा अमरनाथ' म्हणूनही प्रसिद्ध 


श्रीनगरपासून 75 किमी अंतरावर असलेल्या बांदीपूर जिल्ह्यातील अजस गावाच्या भक्कम डोंगरात बांधलेले हे प्राकृत गुंफा मंदिर अनेक घाटांच्या अवघड चढाईनंतर घनदाट जंगलात वसलेले आहे. या मंदिराला स्थानिक लोक "दियानेश्वर मंदिर" आणि इतर लोक 'छोटा अमरनाथ' या नावाने ओळखत होते.


या मंदिरात शिव, पार्वती आणि गणेशाच्या नैसर्गिक स्वरूपातील मूर्तींबरोबरच दगडांवर कोरीव काम करून तयार केलेल्या मूर्तीही आहेत. गुहेतील शिवलिंगावरही पाण्याचा प्रवाह वाहतो, जो दुरून पाहिल्यावर दुधासारखा भासतो. या प्रवासासाठी पर्यटकांना 15 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. 


पूर्वी मोठी जत्रा भरायची


1989 मध्ये काश्मीरमध्ये परिस्थिती बिघडण्यापूर्वी येथे दरवर्षी श्रावण पौर्णिमेला तीन दिवसाची (रक्षाबंधन) मोठी जत्रा भरायची. ज्यामध्ये केवळ काश्मीर खोऱ्यातूनच नव्हे तर देशभरातून भक्त या जत्रेत येत असत. 


स्थानिक लोकांसाठी उत्पन्नाचा स्रोत


ही यात्रा म्हणजे वर्षभरातील स्थानिक लोकांच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत आहे. या यात्रेला जगभरातील विविध ठिकाणांहून भक्त येत असतात. त्यामुळे विविध वस्तूंची खरेदी यात्रेच्या दरम्यान केली जाते. स्थानिक लोकांसाठी हा उत्पन्नाचा मार्ग आहे. 


डीडीसी सदस्य (अरिन) गुलाम मोहिउद्दीन यांच्या मते, स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे, परंतु पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. मोहिउद्दीन म्हणाले, "आम्ही छोटा अमरनाथ यात्रेबद्दल उत्सुक आहोत. मात्र, यात्रेच्या मार्गावरील विद्यमान रस्ते कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली." 


सुरक्षेसाठी कडक व्यवस्था करण्यात येत आहे


या संदर्भात बोलताना डीडीसी सदस्य (अरिन) गुलाम मोहिउद्दीन म्हणाले की, ही यात्रा भक्तांसाठी सुरक्षित व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. यात्रेकरूंना अधिक आरामदायी तीर्थयात्रेसाठी योग्य रस्ता जोडणी आणि सुविधा सुनिश्चित करणे महत्वाचे आहे," त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरु आहेत. तर,अधिकारी अमीर शफी राथेर म्हणाले, "सुरक्षेला प्रथम प्राधान्य आहे. सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग पुरेसा कर्मचारी तैनात करण्यासाठी सज्ज आहे." दरम्यान, प्रशासन दृश्यमानता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी यात्रा मार्गावर सौर दिवे बसविण्याचे काम सुरु आहे.