Medical Education in Hindi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. शाह यांच्या हस्ते आज भोपाळमध्ये (Bhopal) वैद्यकीय शिक्षणाच्या हिंदी अभ्यासक्रमाचा शुभारंभ ( medical education in Hindi) करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. आज हिंदी अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण शाह यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 12 वाजता लाल परेड मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. 


वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देणारं मध्य प्रदेश पहिलं राज्य


वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देणारं मध्य प्रदेश हे पहिलं राज्य असणार आहे, अशी माहिती मध्य प्रदेश सरकारचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी दिली. पहिल्या वर्षी चारपैकी तीन वैद्यकीय पुस्तकांचे इंग्रजीतून हिंदीत भाषांतर करण्यात आले आहे. या पुस्तकांचे भाषांतर करण्याचं काम सोपे नसून वैद्यकीय शिक्षण विभागानं वॉर रुम तयार करून सातत्यानं काम करुन ही पुस्तकं तयार केली आहेत. पहिल्या वर्षी चारपैकी तीन पुस्तकांचा अनुवाद झाला असल्याची माहिती विश्वास सारंग यांनी दिली.


हिंदीतून अभ्यास करणारे विद्यार्थी मागे राहणार नाहीत


तीन विषयांची पाठ्यपुस्तके ही तज्ज्ञांच्या समितीनं तयार केली आहेत. या पुस्तकांचा दुसरा खंड तयार होत असल्याचेही सारंग यांनी सांगितलं. रक्तदाब, पाठीचा कणा, हृदय, किडनी, यकृत किंवा शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांसारख्या तांत्रिक संज्ञा या पुस्तकात चांगल्या पद्धतीनं देण्यात आल्या आहेत. ज्यांनी हिंदीमध्ये एमबीबीएसचा अभ्यास केला आहे ते अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मागे पडणार नाहीत, अशी पाठ्यपुस्तकांची रचना आम्ही केली असल्याचे सारंग म्हणाले.


एका नव्या युगाची सुरुवात होणार


हिंदी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी हिंदी माध्यमाचे विद्यार्थी खूप उत्सुक दिसत असल्याचे वक्तव्य मध्य प्रदेशचे मुथ्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. मध्य प्रदेश सरकारचा हा मोठा उपक्रम आहे. मध्य प्रदेशने अनेक इतिहास रचले आहेत. मात्र, आजच्या दिवशी एका नव्या युगाची सुरुवात होणार असल्याचे शिवराजसिंह म्हणाले. इंग्रजीशिवाय कोणीही अभ्यास करु शकत नाही ही मानसिकता आपण बदलली पाहिजे असेही शिवराजसिंह म्हणाले. देशात वैद्यकीय शिक्षण आता हिंदीत करता येणार आहे. त्याची सुरुवात मध्य प्रदेशातून होत असून, आपल्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे शिवराजसिंह म्हणाले. राज्यातील 97 डॉक्टरांच्या टीमने 4 महिने अहोरात्र परिश्रम करुन या पुस्तकांचे इंग्रजीतून हिंदीत भाषांतर केलं आहे. आम्ही इंग्रजी भाषेच्या विरोधात नाही, पण इंग्रजीशिवाय काम होऊ शकत नाही या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे. इंग्रजी येत नसल्याने अनेक मुले वैद्यकीय शिक्षण सोडतात असेही ते म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


What is Rx : आता मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर 'Rx' ऐवजी 'श्री हरी', पण 'Rx' चा अर्थ काय? जाणून घ्या


Admission Scam : एमबीबीएस प्रवेशाच्या नावावर 26.52 लाखांचा गंडा