मुंगावली : मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 28 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीतील प्रचाराची पातळी खाली घसरताना दिसत आहे. शनिवारी भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कुत्रा म्हणल्याच्या आरोपावर जोरदार प्रत्युत्तर दिलंय.


”कमलनाथ यांनी म्हटले की मी कुत्रा आहे. होय…, कमलनाथ यांनी ऐकावं. मी कुत्रा आहे कारण माझा मालक माझी जनता आहे, जिची सेवा मी करतो आहे. होय कमलनाथ मी कुत्रा आहे कारण कुत्रं आपल्या मालकाचं रक्षण करत असतं. होय कमलनाथ मी कुत्रा आहे, कारण जर का कोणताही व्यक्ती माझ्या मालकाकडे बोट दाखवेल, मालकाशी भ्रष्टाचार व त्याला नुकसान होईल असं धोरण दाखवेल. तर हे कुत्रं त्या व्यक्तीला चावल्याशिवाय राहणार नाही. होय मी कुत्रा आहे. मला अभिममान आहे की मी माझ्या जनतेचं कुत्रं आहे.” असं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अशोकनगर येथील एका सभेत कमलनाथ यांच्यावर पलटवार केला आहे.




कमलनाथ यांनी एका निवडणूक प्रचारादरम्यान शिवराज सिंग चौहान सरकारमधील एका महिला विकास मंत्र्याला 'आयटम' म्हटले होते. तेव्हापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर कारवाई करत त्यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. कमलनाथ यांनी निवडणूक आयोगाच्या या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक प्रचाराला दोन दिवस शिल्लक राहिले असताना निवडणूक आयोगाने कारवाई का केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.


मध्य प्रदेशमध्ये 3 नोव्हेंबरला विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसच्यावतीने कमलनाथ प्रमुख प्रचारक आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या समर्थक आमदारांनीही राजीनामा देत भाजपमध्ये जाणे पसंत केल्याने ही पोटनिवडणूक होत आहे.