MP BJP Candidates List : मध्य प्रदेशात भाजपनं 39 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे विधानसभेसाठी तीन केंद्रीय मंत्र्यांसह सात खासदारांना रिंगणात उतरवलंय. त्यामुळे भाजपची मध्य प्रदेशातली ही यादी अस्वस्थता दाखवते की निवडणूक रणनीतीतली गंभीरता, कठोरता दाखवते याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे दोन याद्या जाहीर झाल्या तरी मुख्यमंत्री शिवराज सिंह (Shivraj Singh Chouhan) यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे भाजप त्यांना उमेदवारी देणार की त्यांचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


Madhya Pradesh Assembly Election : मध्यप्रदेशच्या निवडणुकीसाठी भाजपचा नवा गेम प्लॅन


मध्य प्रदेशच्या निवडणुकीत सात खासदारांना ज्यात तीन केंद्रीय मंत्र्यांचा समावेश त्या सगळ्यांना विधानसभेसाठीचं तिकीट देण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री नरेश तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, फग्गनसिंह कुलस्ते यांना भाजपनं विधानसभेत लढायला सांगितलंय. सोबत भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनाही बऱ्याच वर्षानंतर निवडणुकीत उतरायला सांगितलंय. 


मध्य प्रदेशात निवडणुका जाहीर होण्याआधी भाजपनं आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्यात. या आआधी 17 ऑगस्टला पहिली यादी जाहीर झाली होती. त्यात 39 आणि सोमवारच्या यादीतही 39 जणांची नावं जाहीर झाली. हे पहिल्यांदाच झालंय की निवडणूक जाहीर व्हायच्या आधीच भाजपनं आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करायला सुरुवात केली आहे. 


MP BJP Candidates List : शिवराज सिंह चौहान यांचं नावच नाही 


तिकीट कापण्याचा गुजरात पॅटर्न भाजप मध्य प्रदेशात वापरणार का याची चर्चा आहे. गुजरातमध्ये निवडणुकीच्या काही दिवस आधीच मुख्यमंत्री बदलले होते. आधीचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना विधानसभेचं तिकीटही नाकारलं होतं.आता मध्य प्रदेशात दोन याद्या जाहीर झाल्यात, पण अद्याप त्यात राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं नाव त्यात नाही. 


MP Election 2023 : मध्य प्रदेशात भाजप दिग्गजांना मैदानात का उतरवतंय? 


मध्य प्रदेशात कमलनाथांचा मधला वर्षभराचा काळ सोडला तर सलग दोन दशकं भाजपची सत्ता आहे. सन 2005 पासून शिवराज सिंह चौहान हेच मुख्यमंत्री आहेत. 
मागच्यावेळी खरंतर 230 जागांच्या विधानसभेत काँग्रेस 114 जागा मिळवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या.
पण नंतर ज्योतिरादित्य सिंह यांच्यासह अनेकांनी काँग्रेस सोडून भाजपला साथ दिली. भाजपचं सरकार बनलं.
अँटी इन्कमबन्सी टाळण्यासाठी जुने चेहरे वगळून नव्यांना उतरवणं भाजपला आवश्यक वाटतंय.


मध्य प्रदेशात जाहीरपणे पुन्हा शिवराजसिंह चौहान यांचं नाव भाजपकडून प्रोजेक्ट केलं गेलेलं नाही. या निवडणुका सामूहिक नेतृत्वात लढू असं पंतप्रधान मोदी जाहीर सभांमध्ये सांगत आहेत. आता दोन याद्यांमधे शिवराज सिंह चौहान यांचं नाव अद्याप नाही. अर्थात काहींचं म्हणणं आहे की तूर्तास भाजपनं ज्या अवघड जागा आहेत, त्या ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांना तिकीट मिळणार का याची उत्सुकता कायम आहे. 


मध्य प्रदेशच्या विधानसभेपाठोपाठ अवघ्या काही महिन्यातच लोकसभेची निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या दिग्गजांना भाजपने मैदानात उतरवलं आहे ते निवडून आले तरी पोटनिवडणुकीची वेळ येणार नाही. सोबतच परिस्थिती कठीण असताना परफॉर्मन्स दाखवा हा भाजपचा दिग्गज नेत्यांना आदेश आहे. ही भाजपची रणनीती यशस्वी होणार का हे मतदानातून कळेलच. 


ही बातमी वाचा: