नवी दिल्ली : सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेवाने सर्वप्रथम डायनॉसॉरचा शोध लावला, असा दावा पंजाब विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञाने लावला आहे. डायनॉसॉर्सची नोंद ब्रह्मदेवाने वेदांमध्ये केल्याचं तर्कटही त्यांनी मांडलं आहे.


आशू खोसला हे पंजाब विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ब्रह्मदेवाला माहित नाही, अशी कोणतीच गोष्ट नाही. डायनॉसॉर्सच्या अस्तित्वाबद्दलही त्यांना ज्ञात होतं. याविषयी त्यांनी वेदांमध्ये लिहिलं आहे, असा दावा खोसला यांनी केला.

इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये जैविक संयोजनाबाबत सादर केलेल्या शोधनिबंधात खोसला यांनी या गोष्टीचा उल्लेख केला आहे. पृथ्वीवर जे-जे अस्तित्वात आहे, त्या प्रत्येक गोष्टीविषयी वेदात लिहून ठेवलं आहे, असंही खोसला म्हणतात.

गुजरातमधील खेडा जिल्ह्यात 'भारतीय' डायनॉसॉरचा शोध खोसला आणि त्यांच्या पथकाने लावला होता. त्याचं 'राजसॉरस नर्मदा एन्सिस' असं अधिकृत नामकरण करण्यात आलं आहे.

साधारण 25 ते 30 हजार वर्षांपूर्वी वेद लिहिल्याचं मानलं जातं. डायनॉसॉरचं अस्तित्व मात्र साडेसहा कोटी वर्ष आधीपासून आहे. भूगर्भशास्त्रज्ञांनी या गोष्टीकडे लक्ष वेधलं असता, वेद कागदोपत्री लिहिले नसल्याने त्याला वैज्ञानिक आधार नसल्याचं उत्तर खोसलांनी दिला.