नवी दिल्ली : केंद्र सरकारककडून आर्थिक वर्ष 2018-19 मधील निर्यातीबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. निर्यात क्षेत्रात भारताने चांगली कामगिरी केली असल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात भारताच्या निर्यातीत 9 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे भारताचा व्यापार 331 अब्ज डॉलर इतका वाढला आहे.


निर्यातीत झालेल्या 9 टक्के वाढीमुळे भारताने 2013-14 मध्ये नोंदवण्यात आलेल्या निर्यातीचा विक्रम यंदा मोडीत निघाला आहे. 2013-14 मध्ये भारताने निर्यातीत 314.4 अब्ज डॉलर इतका व्यापार केला होता. तो विक्रम भारताने यंदा मोडला आहे. फार्मा, रसायन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातीत झालेल्या वृद्धीमुळे यंदा एकूण निर्यातीत वाढ झाली आहे.

वाणिज्य मंत्रालयाने याबाबत म्हटले आहे की, जागतिक व्यापार क्षेत्रात मंदी असूनही भारताने निर्यात क्षेत्रात वाढ केली आहे. वैश्विक स्तरावर व्यापार क्षेत्रात सध्या मोठमोठी आव्हाने समोर उभी असूनही भारताची कामगिरी ही कौतुकास्पद आहे.