श्रीनगर : पाकिस्तान विरोधात अणुबॉम्ब वापराबाबतच्या वक्तव्यावरुन जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री, पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भारताने अनुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवला नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होत. त्यावर पाकिस्तानने देखील अणुबॉम्ब ईदसाठी ठेवला नसल्याची टीका मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे.
मेहबुबा मुफ्ती यांनी नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचार सभेतील भाषणांवरही नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान टीका करताना अत्यंत खालच्या स्तरावर जात असल्याबद्दल मेहबुबा मुफ्तींनी चिंता व्यक्त केली.
मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं की, "जर भारताने दिवाळीसाठी अणुबॉम्ब ठेवलेला नाही, तर पाकिस्ताननेही त्यांचा अणुबॉम्ब ईदसाठी ठेवलेले नाही आणि हे जगजाहीर आहे. निवडणूक प्रचारादरम्यान सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य का करत आहेत, हे कळत नाही. मोदींमुळे राजकीय चर्चांचा दर्जा खालावला आहे", असा आरोप मेहबुबा यांनी केला.
पाकिस्तान नेहमी भारताला अणुबॉम्बची धमकी देतो. परंतु भारत आता त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. पूर्वी दररोज आमच्याकडे न्युक्लिअर बटन आहे, या गोष्टीचा पाकिस्तानकडून पुनरुच्चार होत होता. मात्र आमच्याकडे असणारा अणुबॉम्ब आम्ही काही दिवाळीसाठी ठेवलेला नाही. घरात घुसून आम्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला. राजस्थानच्या बाडमेरमधील प्रचारसभेत ते बोलत होते.
VIDEO | नरेंद्र मोदी दहशतवादी संघटनेचे सदस्य : प्रकाश आंबेडकर