नवी दिल्ली :  सुप्रीम कोर्टाच्या राफेल व्यवहाराबाबतच्या निर्देशावर भाष्य करताना व्यक्त केलेले मत प्रचाराच्या जोशात केले होते, असे सांगून राहुल गांधी यांनी खेद व्यक्त केला आहे. राफेल व्यवहाराबाबत गहाळ झालेली काही कागदपत्रे प्रसार माध्यमांत प्रसारित झाल्यावर सुप्रीम कोर्टाने ती ग्राह्य धरण्याचे निर्देश दिले होते. सुप्रीम कोर्टाचे हे निर्देश 'चौकीदार चोर है' हे मान्य करणारे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना केला होता. त्यावर भाजपने आक्षेप घेतला होता.


आज सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, "मी निवडणुकीसाठी प्रचाराच्या जोशात असे बोलून गेलो." राफेल व्यवहारप्रकरणी सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी राहुल यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.

27 पानी प्रतिज्ञापत्रान राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, "मी पंतप्रधानांना चोर म्हणालो नाही, 'चौकीदार चोर है' ही आमची राजकीय घोषणा आहे. निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात मी कोर्टाच्या निर्देशांबाबत बोलताना चुकीचे विधान केले."

राफेल व्यवहाराशी संबधित काही माहिती लिक झाली होती. सुप्रीम कोर्टाने लिक झालेल्या दस्तावेजांना वैध मानून राफेल व्यवहारावरील पुनर्विचार याचिका स्वीकारली होती. त्यानंतर राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हणाले होते की, "सुप्रीम कोर्टाने चौकीदार चोर असल्याचे म्हटले आहे." यावर सुप्रीम कोर्टानेदेखील आक्षेप घेत

राहुल यांच्या या वक्तव्यावरुन भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधींविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने नोटीस धाडून राहुल गांधींकडे याबाबत उत्तर मागवले होते. याप्रकरणी राहुल यांनी आज सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचा असा अर्थ लावणे चुकीचे असल्याचे राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने राहुल यांच्यावर टीका करणे सुरु केले आहे. राहुल गांधी खोटारडे असून त्यांच्यावर सत्याने विजय मिळवला असल्याचे ट्वीट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे.

याप्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, "राफेल प्रकरणी राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाची माफी मागावी लागली आहे, याचा अर्थ ते इतके दिवस खोटं बोलत होते. काँग्रेस किती खोटा प्रचार करत होती, हे यावरून सिद्ध झाले आहे. त्यांना जो कुणी गुरू भेटला आहे त्याने त्यांना सांगितले की खोटं बोला पण जोरात बोला. विरोधक हताश निराश झाले आणि त्यामुळे त्यांचा तोल ढळत आहे."