भोपाळ : महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे मध्य प्रदेशमधील प्रवक्ते आणि मीडिया संपर्क आयोजक अनिल सौमित्र यांनी केलं आहे. या वक्तव्यानंतर भाजपने त्यांना निलंबित केलं आहे.


अनिल सौमित्र यांना आपल्या फेसबुक वॉलवर लिहलं होतं की, "महात्मा गांधी राष्ट्रपिता होते, मात्र ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. भारतात त्यांच्यासारखे कोट्यवधी पूत्र आहेत. त्यातील काही लायक तर काही नालायक आहेत." महात्मा गांधी राष्ट्रपिता होऊ शकतात, मात्र ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता असू शकतात. भारताचे पिता असणाऱ्याचा आजवर कोणाचा उल्लेख नाही.


भाजपने सात दिवसात मागवलं स्पष्टीकरण


भाजपचे मध्य प्रदेशमधील मीडिया विभाग प्रमुख लोकेंद्र पाराशर यांनी याबद्दल सांगितलं की, भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी सौमित्र यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या वक्तव्याप्रकरणी सौमित्र यांची प्राथमिक सदस्यता रद्द करत निलंबन करण्यात आलं आहे. तसेच सात दिवसात त्यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे.


सौमित्र यांचा काँग्रेसवर निशाणा


सौमित्र यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "आम्ही महात्मा गांधींच्या विचारांना पंच-निष्ठेने स्वीकारले आहे. त्यांच्या रामराज्याचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेन आम्ही वाटचाल करत आहोत. स्वच्छतेचा त्यांचा विचाराला आम्ही राष्ट्रीय ध्येय बनवलं. मात्र काँग्रेसने काय केले? कट रचून नकली गांधी विकसीत केले आणि गांधी नावाचा वापर केला. पिढ्यांपिढ्या गांधी नावाचा वापर करुन मतं विभागली आणि सत्ता मिळवली. त्यामुळे गांधीजींच्या विचारांचा हत्यारा कोण आहे? राजकारण आणि षडयंत्र करणाऱ्यांनी महात्मा गांधींच्या विचारांची हत्या केली, असा आरोप अनिल सौमित्र यांनी केला.



नथुराम गोडसे देशभक्त : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर


मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक आणि अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्याला प्रज्ञाने प्रत्युत्तर दिलं. गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता. त्यानंतरच देशात दहशतवादाची सुरुवात झाल्याचं हासन म्हणाले होते. यावर साध्वी प्रज्ञा सिंहची प्रतिक्रिया विचारली असता 'नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील. त्याला दहशतवादी म्हणवणाऱ्यांनी आधी अंतरंगात डोकावून पाहावं. अशा लोकांना निवडणुकीत योग्य उत्तर मिळेल', असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंहने केलं होतं.