लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान रविवार 19 मे रोजी होणार आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावण्याआधी पंतप्रधानांनी पत्रकार परिषदेत सहभाग घेतला. सुरुवात अमित शाह यांनी केली. सुमारे 20 मिनिटांच्या मनोगतानंतर माईक मोदींकडे आला.
'ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचं अभिमानाने जगाला सांगतो. लोकशाहीची ताकद जगासमोर दाखवणं आपलं कर्तव्य आहे. आपली लोकशाही कशी विविधतेने नटलेली आहे, हे आपण दाखवून द्यायला हवं' असं आवाहन मोदींनी केलं. दीर्घ कालावधीनंतर 2014 मध्ये पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन झालं. 2019 मध्ये याची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
Press Conference | पंतप्रधान मोदींची पहिली पत्रकार परिषद | UNCUT | नवी दिल्ली
रमजान, आयपीएल, विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असताना या कालावधीतच लोकसभा निवडणुका पहिल्यांदाच झाल्या. प्रसारमाध्यमांनी खूप मेहनत घेतली. अनेक चढउतार आले, पण देशाच्या जनतेने पाठिंबा दिला. त्यांनी दिलेल्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद, असं म्हणत मोदींनी आभार व्यक्त केले.
सुमारे 13 मिनिटांचं मोदींचं मनोगत पार पडलं. एका पत्रकाराने मोदींकडे रोख असलेला प्रश्न विचारला, तेव्हा 'हम तो डिसिप्लिन्ड सोल्जर है, हमारे लिए अध्यक्षजीही सब कुछ है' असं म्हणत उत्तराचा चेंडू मोदींनी अमित शाहांकडे टोलवला. मोदींना विचारलेल्या 18 पैकी एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही. याउलट राहुल गांधींनी त्यांना विचारलेल्या सर्वच्या सर्व 15 प्रश्नांना उत्तरं दिली.
VIDEO | मोदींच्या पत्रकार परिषदेत मागचे दरवाजे बंद करण्यात आले : राहुल गांधी
राफेलप्रश्नी पंतप्रधानांनी मौन का बाळगलं आहे, अनिल अंबानी यांच्याबाबतच्या प्रश्नांचा राहुल गांधींनी पुनरुच्चार केला. मोदी माझ्याशी वादविवाद का करत नाहीत, असा सवालही त्यांनी विचारला. पंतप्रधानांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत सहभाग घेतल्याबद्दल राहुल गांधींनी ट्विटरवरुन त्यांना टोला हाणला. 'अभिनंदन मोदी जी, शानदार प्रेस कॉन्फरन्स. पुढच्या वेळी श्री शाह कदाचित तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं देण्याची संमती देतील. एकदम मस्त' असं उपहासात्मक ट्वीट राहुल गांधींनी केलं.