मुंबई : युद्ध इतिहासात तर खूप मोठे लीडर होते. पण राजकीय नेत्यांमध्ये बाळ गंगाधर टिळक हे आदर्श आहेत. आधुनिक भारतामध्ये जो राष्ट्रवाद जागृत झाला तो बाळ गंगाधर टिळक यांच्यामुळे झाला आहे. त्यामुळे बाळ गंगाधर टिळक आधुनिक भारताचे लीडर होते, असे मत लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केले. एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते.


नरवणे म्हणाले, आर्मीमध्ये रूजू होऊन जवळजवळ चाळीस वर्षे झाली आहेत. जेव्हा शीख लाईट इन्फंट्री मिळाली तेव्हा त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. आय एम ए मध्ये आम्हाला सर्व्हिसेस दिली जातात त्यामध्ये लॉटरी सारखीच असते. पण आता इतक्या वर्षानंतर असं वाटतं की मी लकी होतो की, ज्यामुळे मला शीख लाईट इन्फंट्री मिळाली. मी आज ज्या पदावर आहे ते केवळ या रेजिमेंटच्या मुळेच आहे.

एनडीएच्या आठवणींना उजाळा देताना नरावणे म्हणाले, एनडीएचे दिवस मला रोजच आठवतात. तीन वर्ष आम्ही एनडीएमध्ये होतो. बॉईज टू मॅन करण्याच काम एनडीएनं केलं आहे. एकाच वेळी तिनही दलांचे प्रमुख एनडीएचे असणे हे इतिहासात दुसर्‍यांदा होत आहे. यापूर्वी एनडीएचे पहिला कोर्स होता आणि त्यानंतर पंचवीस वर्षानंतर हा 56वा कोर्स आहे. ज्यामध्ये एकाच कोर्सचे तिनही दलांचे प्रमुख झाले आहे. दुसऱ्यांदा हा योग आला आहे. आमच्या कोर्ससाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही तिघेही एनडीएला एकत्र होतो. एअर चीफ आणि मी एकाच कोर्समध्ये होतो. तीन वर्ष एकमेकांना जवळून पाहिला आहे. आम्ही तिघेही एनडीएच्या आधीपासून एकमेकांना ओळखतो. त्यामुळे आमच्यामध्ये को-ऑर्डिनेशन आणि अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे.

Manoj Narvane Exclusive | लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांची पहिली मराठी मुलाखत | ABP MAJHA



आईविषयी सांगताना नरवणे म्हणाले, आईच्या आवाजात लष्करप्रमुख नियुक्तीची बातमी ऐकायला आवडलं असतं पण ते घडू शकलं नाही याचं वाईट वाटलं. मुलगा इतक्या मोठ्या पदावर पोहोचला हे बघायला आई हवी होती. मुलाने आर्मीत जावे असे त्यांना अजिबात वाटत नव्हतं पण जेव्हा मी माझी इच्छा सांगितली त्यानंतर मात्र तिने कधी थांबवलं नाही कायम सपोर्ट केला. लष्कर जॉईन केल्यानंतर या पदापर्यंत पोहोचेन असा विचार कधी केला नव्हता. कारण लष्करात आम्ही नेहमी जवळचं टारगेट पाहत असतो. एक टप्पा झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचा विचार करत असतो.

आर्मीमध्ये गेलो नसतो तर मी आर्किटेक्ट झालो असतो. या विषयी सांगताना नरवणे म्हणाले, माझे वडील एअरफोर्स मध्ये होते. त्यांच्यासोबत मी जगभर हिंडलो आहे. घरी मिलिटरी हिस्टरी, वर्ल्ड वॉरची पुस्तके होती. लहान असताना मी कमांडो कॉमिक्स वाचायचो. आर्मीमध्ये नसतो गेलो तर मी आर्किटेक्ट झालो असतो. आयन रँडचं फाऊंटनहेड आहे पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटलं की मी आर्किटेक्ट बनण्याची इच्छा झाली होती. फ्रान्समध्ये गेलो होतो तेव्हा दुसऱ्या महायुद्धात ज्या ठिकाणी युद्ध घडलं होतं त्या ठिकाणी गेलो होतो तो प्रसंग आजही माझ्या लक्षात आहेत.