नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निवडणूक आयोगानं  (Election Commission)देशातील लोकसभा निवडणुका सात टप्प्यात जाहीर केल्या होत्या. यापैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. मात्र, पाचव्या टप्प्यात एक वेगळी गोष्ट घडली आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानात महिला मतदारांनी आघाडी घेतली आहे. पाचव्या टप्प्यात विविध राज्यांमध्ये लोकसभेच्या  49 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. याबाबतचं वृत्त द इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.



पाचव्या टप्प्यात बिहार, झारखंड, लडाख, ओडिशा, उत्तर प्रदेश,जम्मू काश्मीर, महाराष्ट्र आणि  पश्चिम बंगालमध्ये 49 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. यापैकी बिहार, झारखंड, लडाख, ओडिशा आणि उत्तर प्रदेश या राज्यात महिलांच्या मतदानाची टक्केवारी अधिक आहे. तर, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये  पुरुष मतदारांची संख्या अधिक आहे. 


लोकसभेच्या 49 जागांसाठी पाचव्या टप्प्यात 62.5 टक्के मतदान पार पडलं आहे. 2019 मध्ये पाचव्या टप्प्यात 61.82 टक्के मतदान पार प़लं होतं. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पाचव्या टप्प्यात 8.95 कोटी मतदारांनी मतदान केलं.  यामध्ये 4.69 कोटी पुरुष मतदार तर 4.26 कोटी महिला मतदार, आणि 5409 तृतीयपंथीयांनी मतदान केलं आहे. 


कोणत्या राज्यात  किती मतदान?


बिहार :  पुरुष :52.42 टक्के,  महिला :61.58,  एकूण :56.76


झारखंड : पुरुष :58.08 टक्के, महिला : 68.85, एकूण :63.21


लडाख : पुरुष :71.44 टक्के, महिला :72.20, एकूण :71.82


ओडिशा: पुरुष :72.28 टक्के, महिला :74.77, एकूण :73.50


उत्तर प्रदेश : पुरुष :57.60 टक्के, महिला :58.51, एकूण :58.02


जम्मू काश्मीर: पुरुष :62.52 टक्के, महिला :55.63, एकूण :59.10


महाराष्ट्र : पुरुष :58.28 टक्के, महिला :55.32, एकूण :56.89


पश्चिम बंगाल: पुरुष :78.48 टक्के, महिला :78.43, एकूण :78.45


लोकसभेच्या पहिल्या पाच टप्प्यांपैकी पहिल्या चार टप्प्यात पुरुष मतदारंच्या मतदानाची टक्केवारी अधिक होती. मात्र, आता पाचव्या टप्प्यात देशभरात महिला मतदारांनी बाजी मारली आहे. 


महाराष्ट्रातील मतदान पूर्ण 


महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे 48 मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघातील मतदान पूर्ण झालं आहे. पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान झालं.  मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, ईशान्य मुंबई या सहा लोकसभा मतदारसंघांसह ठाणे, पालघर, भिवंडी, कल्याण डोंबिवली, धुळे, नाशिक आणि दिंडोरी याठिकाणी मतदान झालं. या जागांवरील मतदानाची टक्केवारी पाहिली असता पुरुष मतदारांनी अधिक मतदान केल्याचं एकूण टक्केवारीतून समोर आलं आहे. देशातील उर्वरित दोन टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.  


संबंधित बातम्या :


पंतप्रधान मोदींनी लक्ष्मण रेषा ओलांडलीय, लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतीसारखी करुन ठेवलीय : प्रकाश आंबेडकर


राज्यातील आचारसंहिता शिथील करा; महाराष्ट्र सरकारची निवडणूक आयोगाकडे पत्रातून मागणी, नेमकं कारण काय?