Prakash Ambedkar Interview: नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्याचं दिसतंय. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली आहे. 


वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीचं रुपांतर ग्रामपंचायत निवडणुकीत केलं असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे. 


पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीचं रुपांतर ग्रामरूपंचायत निवडणुकीत केलं : प्रकाश आंबेडकर 


इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "तत्कालीन पंतप्रधानांनी आपापल्या पक्षांचा प्रचार केला हे खरं आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचं रूपांतर ग्रामपंचायत निवडणुकीत केलं आहे. पंतप्रधान मोदी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रचार करतात आणि विधानसभा निवडणुकीतही तेच करतात. स्थानिक पातळीवरील निवडणुकीतही पंतप्रधान मोदी हेच करतात."


"वंचित बहुजन आघाडी (VVA) महाराष्ट्रात 48 पैकी 3 जागा जिंकेल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आम्ही 38 जागांवर आमचे उमेदवार उभे केले आहेत. खरं तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MVA) आणि राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. दुसरीकडे भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत दोन आघाड्यांमध्ये आहे.", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. 


प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात


प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "पंतप्रधान मोदी प्रचारादरम्यान वैयक्तिक हल्ले करत आहेत, जे अत्यंत वाईट आहे. पंतप्रधानांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा खालावली आहे. सत्ताधारी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणेचा कसा वापर करतात, हे या निवडणुकीनं दाखवून दिलं आहे."  


दरम्यान, काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष केंद्र सरकारवर तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की, हे सर्व राजकीय सूडबुद्धीनं केलं जात आहे. तर तपास यंत्रणा आपलं काम करत असल्याचं सांगत भाजपनं विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.