Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून भाजपविरोधात एकजूट करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सध्याचं सत्ताधारी एनडीए सरकार (NDA Government) विजयाची हॅट्रिक मारण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी टाईम्स नाऊने 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील जागांच्या संदर्भात सर्वेक्षण केलं होतं, ज्याचा निकाल विरोधी आघाडीची (INDIA) झोप उडवणारा आहे.


टाईम्स नाऊच्या ईटीजी सर्वेक्षणानुसार, 49 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी आघाडी (INDIA) पंतप्रधान मोदींसमोर टिकू शकणार नाही. दुसरीकडे, 19 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, एकजूट झालेले विरोधक भाजपला काही प्रमाणात टक्कर देऊ शकतात. तर भाजपविरोधात एकत्र आलेली विरोधकांची आघाडी भाजपला कडवी टक्कर देईल, असा विश्वास सुमारे 17 टक्के लोकांनी व्यक्त केला आहे. तर 15 टक्के लोकांनी येत्या निवडणुकांबद्दल काहीच सांगता येत नसल्याचं म्हटलं आहे.


सर्वेक्षणात पक्षांना मिळाल्या इतक्या जागा


ईटीजी सर्वेक्षणानुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला चांगली आघाडी मिळताना दिसत आहे. सर्वेक्षणात भाजपच्या आघाडीला 292 ते 338 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी काँग्रेस पक्षाने तयार केलेल्या आघाडीला 106 ते 144 जागा मिळाल्याची बाब समोर आली आहे.


दुसरीकडे, टीएमसीसाठी 20 ते 22 जागा, वायआरसीपीसाठी 24 ते 25 जागा, नवीन पटनायत यांच्या बीजेडीसाठी 11 ते 13 जागा आणि इतरांच्या खात्यात 50 ते 80 जागा दिसत आहेत. जेव्हा टाईम्स नाऊने हे सर्वेक्षण केले तेव्हा टीएमसी विरोधी आघाडीचा भाग नव्हता.


लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा तगडा उमेदवार कोण?


लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा तगडा उमेदवार कोण असू शकतो? यावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार 13 टक्के लोकांनी राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, असा विश्वास दर्शवला आहे. सर्वेक्षणातून 12 टक्के लोकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना पंतप्रधानपदासाठी मत दिलं आहे.


या सर्वेक्षणात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे एक मजबूत पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, यावर केवळ 6 टक्के लोकांनी विश्वास ठेवला. तर 5 टक्के लोकांनी केसीआर यांच्या बाजूने मतदान केलं. तर सर्वाधिक 64 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, सध्याचे पंतप्रधान मोदी हेच 2024 च्या लोकसभेसाठी मजबूत उमेदवार असू शकतात.


हेही वाचा:


EPFO Interest Rate: कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! खात्यात जमा PF वर मिळणार जबरदस्त व्याज; वाचा सविस्तर...