Lata Mangeshkar Award : पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पुरस्काराने 24 एप्रिलला मुंबईत सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्यास अनुकूलता दर्शवली आहे, अशी माहिती उषा मंगेशकरांनी दिली आहे. नरेंद्र मोदी लतादिदींना बहिण मानतात. देशाप्रती असलेले नरेंद्र मोदींचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराकरता 24 एप्रिलला मुंबईत निमंत्रित करण्यात आले आहे.
उषा मंगेशकर यांच्या हस्ते 'लता दिनानाथ मंगेशकर' हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. मनोरंजन, क्रीडा, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्काराविषयी बोलताना ह्रदयनाथ मंगेशकर म्हणाले, "प्रत्येत क्षेत्रातील दिग्गजांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांसारख्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाईल. दीदींच्या ओळखीचा आणि दीदींच्या नावाला शोभेल असा पुरस्कारार्थी असायला हवा. 15 वर्षांपूर्वी आम्ही दीनानाथ मंगेशकर नवं हॉस्पिटल बांधलं होतं तेव्हा नरेंद्र मोदींनी या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं होतं. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. दरम्यान भाषणात लता दिदींनी, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.
ह्रदयनाथ मंगेशकर पुढे म्हणाले, आम्ही लता दीदींच्या फोटोला हार घालत नाही, केवळ फुलं वाहतो. मास्टर दिनानाथ मंगेशकरांच्या पुण्यतिथीला 80 वर्षे पूर्ण होत आहेत. लता दिदींच्या सांगितीक कारकिर्दीलादेखील 80 वर्षे पूर्ण होत आहेत. 24 एप्रिलला लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचा फलकदेखील लागणार आहे.
संबंधित बातम्या