मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र कोकणात पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय.



पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून या घटनेवर दु:ख व्यक्त करण्यात आलंय.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सानुग्रह मदत तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे' असंही या ट्विटमध्ये म्हटलं गेलंय.


कशी घडली दुर्घटना?


काल रात्रीच्या सुमारास ही दरड कोसळल्याची माहिती आहे.  मात्र हा दुर्गम डोंगराळ भाग असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. मात्र काही वेळापूर्वी एनडीआरएफची टीम ज्यावेळी इथं पोहोचली त्यावेळी ही भयंकर घटना समोर आली. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. गेल्या काही तासांपासून इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनची टीम देखील या ठिकाणी काम करत आहे. घटनेनंतर या गावालगतच्या सर्व वाड्यांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. 


 वस्त्यांमधील रहिवाशांनी स्थलांतरासाठी प्रशासनास सहकार्य करावं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला तसेच बचाव मदत कार्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दरड कोसळण्याच्या झालेल्या दोन दुर्घटनेतील मृतांबाबत शोक व्यक्त करून अशा प्रकारे डोंगर उतारांवरील गावे व वस्त्या येथील रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतर करण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.