नवी दिल्ली : बुधवार 13 डिसेंबर रोजी संसदेत (Loksabha) घुसखोरीचा  कथित सूत्रधार ललित झा (Lalit Jha ) याला चौकशीसाठी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी त्याची 15 दिवसांची कोठडी मागितली होती. उल्लंघन केल्यापासून फरार असलेल्या झा याने गुरुवार रात्री दिल्लीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. बिहारचा असलेला ललित झा कोलकाता येथे शिक्षक म्हणून काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. 


याप्रकरणात आतापर्यंत पाच पुरुष आणि एका महिलेवर दहशतवादविरोधी कडक कायद्यांअतंर्गत आणि भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  लोकसभेत (Lok Sabha) घुसखोरी करणाऱ्या चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोकसभेत पकडले गेलेले सागर शर्मा आणि डी मनोरंजन आणि संसदेबाहेर अटक करण्यात आलेले नीलम देवी आणि अमोल शिंदे यांची सविस्तर चौकशी करावी लागेल, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. दरम्यान आता ललित झा याला देखील सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


प्रेक्षक गॅलरीतून ललितने केले शुटिंग


गुरूग्राममध्ये ललित झा याने एक महत्त्वाची बैठक घेत हा कट आखला होता, असं पोलीस तपासात आली आहे. लोकसभेत मनोरंजन आणि सागर शर्माने घुसखोरी केली तेव्हा प्रेक्षक गॅलरीतून या प्रकाराचं शुटींग ललितनेच केलं आणि सोशल मीडियावर अपलोड केलं. तसेच, ललित झासोबत चौघेही आरोपी संपर्कात होते. घटना होण्याआधी त्याने चौघांचे फोन ताब्यात घेतले आणि तो फरार झाला, असं पोलिसांनी म्हटलंय. ललित झाचं शेवटचं लोकेशन नीमरानाजवळ आढळलंय. ललित झाचा संबंध असलेल्या एका एनजीओचीही चौकशी केली जातेय. या एनजीओला येणारा निधी कुठून येतो याचा तपास सुरू आहे.


लोकसभेचं कामकाज सुरू असताना घडली घटना


लोकसभेचं कामकाज सुरू असताना  अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावू लागले. संसदेत विषारी धूर सोडला. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाला खासदार कोटकांनी पकडलं. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर मात्र प्रश्न उपस्थित झाले. धक्कादायक बाब म्हणजे खासदाराच्या प्रताप सिम्हा यांच्या पासवर हे दोन्ही तरुण सभागृहात शिरले. खासदारार प्रताप सिम्हा हे भाजपचे नेते आहेत. त्यांच्याच शिफारसीवर आरोपीचा पास तयार करण्यात आला होता त्यामुळे या अनुशंगानेही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : 


संसद घुसखोरी प्रकरणाचा मास्टरमाईंड ललित झा दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, फरार झाल्यानंतर गेला होता राजस्थानला