Lakhimpur Violence : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमधील हिंसाचार प्रकरणी तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एसआयटी स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राकेश कुमार जैन यांची तपासावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं एका महिलेसह तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटीमध्ये नियुक्ती करण्याचे आदेशही दिले आहेत. या एसआयटीमध्ये शिरोडकर, प्रीतींदर सिंग आणि पद्मजा चौहान हे अधिकारी असतील. न्यायमूर्ती जैन निष्पक्ष तपास करतील, असं न्यायालयानं म्हटलं आहे. एसआयटीनं तपास पूर्ण केल्यानंतर आणि स्टेटस रिपोर्ट सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर पुन्हा सुनावणी करणार आहे.
लखीमपुरात काय झालं होतं?
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.
आशिष मिश्रा यांचा घटनास्थळी नसल्याचा दावा
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांसह आठ जणांच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि भाजप नेते अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा संशयाच्या भोवऱ्यात आहे. मात्र, त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. एबीपी न्यूजशी खास बातचीत करताना आशिष मिश्रा यांनी एफआयआरबाबत सांगितले होते की, यूपीच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि तपासात सत्य समोर येईल.
ठार झालेल्या चालकाचा फोटो हा महत्त्वाचा पुरावा
चौकशीदरम्यान ठार झालेल्या चालकाचा फोटो महत्त्वाचा पुरावा झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनाच्या वेळी हरिओमने पिवळ्या रंगाचा धारीदार शर्ट घातला होता, तर आशिष मिश्रा यांच्या वतीने हरिओमला थार जीपचा चालक म्हणून सांगण्यात आले होते. वास्तविक, व्हायरल व्हिडिओ आणि फोटोमध्ये थार जीपचा चालक पांढऱ्या शर्टमध्ये पहायला मिळत आहे.
आशिष मिश्रा उर्फ मोनू घटनेच्या दिवशी पांढऱ्या शर्टमध्ये होते. अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने मोनूच्या थार जीपमध्ये उपस्थित असल्याचाही उल्लेख केला आहे. आरोपींनी सांगितले होते की, घटनेनंतर लवकरच मोनू राईस मिलमध्ये गेले होते. थार जीपमधून सापडलेल्या 315 बोअर मिस काडतुसांचा तपास सुरू आहे. आशिष मिश्रा यांचे 315 बोअरचे परवानाधारक शस्त्र काडतूस असल्याचा संशय आहे. एसआयटीने सरकारकडे फॉरेन्सिक टीमची मागणी केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
यूपी पोलिसांकडून लखीमपूर घटनेसंदर्भात 6 फोटो प्रसिद्ध; ओळख सांगणाऱ्याला बक्षीस मिळणार