Lakhimpur Kheri Case: यूपी पोलिसांनी लखीमपूर घटनेबाबत 6 फोटो जारी केली आहेत. हे सर्व फोटो टिकुनिया येथील घटनास्थळाचे आहेत. 3 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी 8 लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 शेतकरी, 3 भाजप कार्यकर्ते आणि एका पत्रकाराचा समावेश आहे. या घटनेत आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी पोलिसांनी एकतर्फी तपासाचा आरोप केल्यानंतर आता या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. आता यूपी पोलीस त्या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.


याच घटनेत स्थानिक पत्रकार रमण कश्यप यांचीही जमावाने हत्या केली होती. यूपी पोलिसांनी सांगितले की, फोटोमध्ये हल्लेखोरांची ओळख उघड करणाऱ्यांना बक्षीस मिळेल आणि त्यांचे नावही गुप्त ठेवले जाईल. आतापर्यंत पोलिसांनी त्याच लोकांना पकडले आहे ज्यांच्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या वाहनांनी चिरडल्याचा आरोप आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा मोनू यांचा समावेश आहे.


असा आरोप आहे की ज्या थार कारखाली लोकं चिरडल्यानंतर मरण पावले होते, ती त्यांच्याकडून चालवली जात होती. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांनी लखीमपूरला जाऊन पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आता या घटनेत मारल्या गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या समर्थनासाठीही आवाज उठवला जात आहे. त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की आतापर्यंत यूपी पोलिसांची कारवाई एकतर्फी होती. ज्यांनी आमच्या लोकांचा जीव घेतला त्यांना पकडले गेलेले नाही.


एसआयटी लखीमपूर घटनेची चौकशी करत आहे. पोलिसांनी 6 फोटो जारी केले आहेत. या घटनेशी संबंधित सर्व व्हिडिओ आणि फोटो पाहिल्यानंतर पोलिसांनी हे फोटो प्रसिद्ध केले आहे. यातील काही लोक हातात लाठ्या-काठ्या घेऊन दिसतात. तर काही लोक रागात बोट दाखवताना दिसतायेत. त्याचवेळी काही लोक धावताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये सुमारे 30-35 चेहरे आहेत. त्यापैकी बहुतेक तरुण आहेत आणि दोन किंवा चार वृद्ध देखील आहेत. रिव्हॉल्व्हर किंवा पिस्तूल सारखी हत्यारे कोणाच्या हातात दिसत नाहीत. एका फोटोत जीप जळत आहे.


डीआयजीसह पाच पोलिस अधिकाऱ्यांचे क्रमांक जारी करण्यात आले आहेत, जिथे फोन करून आरोपींची माहिती देता येईल. हे मोबाईल क्रमांक 9454400454, 9454400394, 9454401072, 9454401486 आणि 9450782977 आहेत. लखीमपूर घटनेच्या दोन्ही बाजूने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, म्हणजे शेतकरी तसेच भाजप कार्यकर्ते. सुमित जयस्वाल यांनी भाजपच्या वतीने एफआयआर दाखल केला होता, पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.