Lakhimpur Kheri Violence: वाढत्या दबावापुढे यूपी सरकारने एक पाऊल मागे घेत राजकीय नेत्यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला भेट देण्याची परवानगी देण्यात आली आहे. राहुल गांधींनी लखनौला जाण्यासाठी काही वेळापूर्वी दिल्ली विमानतळ सोडले आहे. पंजाब आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही राहुल यांच्यासोबत जात आहेत. काँग्रेसचे तीन्ही नेते लखीमपूर खेरीच्या पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील.
उत्तर प्रदेश सरकारच्या गृह विभागाने सांगितले की, राज्य सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर तीन जणांना लखीमपूर खेरीला भेट देण्याची परवानगी दिली आहे.
अजय मिश्रा गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी पोहोचले
लखीमपूर घटनेवरून सुरू असलेल्या राजकीय गदारोळादरम्यान गृह राज्यमंत्री अजय मिश्रा आज दिल्लीला पोहोचले. अजय मिश्रा नॉर्थ ब्लॉकमधील आपल्या कार्यालयातून गृहमंत्री अमित शाह यांना त्यांच्या घरी भेटले. गृहमंत्र्यांशी चर्चा केली. लखीमपूरच्या घटनेनंतर ते प्रथमच दिल्लीत आले आहेत.
लखीमपूर खेरी हिंसाचाराला तीन दिवस झाले असले तरी हिंसाचाराला जबाबदार कोण हा प्रश्न अजूनही कायम आहे. लखीमपूर घटनेनंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा चौकशीच्या कक्षेत आहेत. मात्र, दोघेही सांगतात की घटनेच्या वेळी ते तिथं नव्हते.
लखीमपुरात काय झालं होतं?
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.