लखनऊ : शांतता भंग करणे आणि जमावबंदीच्या 144 या कलमाचे उल्लंघन करणे या आरोपाखाली काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना सितापूर जिल्ह्यातील हरगावमधून अटक केली आहे. लखीमपूर खेरी या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रियांका गांधी या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटायला जात होत्या. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रियांका गांधींच्या अटकेनंतर उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. (Priyanka Gandhi Vadra Arrested for violating Section 144).


काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या सोबत राज्यसभेचे खासदार दिपेंद्र हुड्डा आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू तसेच इतर 11 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती सितापूर जिल्ह्यातील हरगाव पोलीस स्टेशनच्या एसएचओ यांनी दिली आहे. प्रियांका गांधींच्या अटकेनंतर सितापूरमध्ये पक्षाच्या समर्थकांनी जोरदार आंदोलन सुरु केलं आहे. 


लखीमपूर खेरी या ठिकाणी जाणाऱ्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना काल अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतरही जवळपास 30 तास त्यांच्यावर कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. आता त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर, आशिष मिश्रावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या दबावामुळे पोलिसांनी आशिष मिश्रावर हत्या, गैरव्यवहार, दुर्घटना करण्याचा हेतू अशा विविध आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे. 


लखीमपुरात काय झालं होतं?
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 


संबंधित बातम्या :