Kuno National Park : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू (Cheetah Death) झाल्याची घटना घडली. रविवारी चार वाजण्याच्या सुमारास चित्त्याचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.  'उदय' असं या चित्त्याचं नाव असून, त्याचे वय सहा वर्ष होते. मागील दोन महिन्यात कुनो नॅशनल पार्कमध्ये दुसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे.


मागील काही दिवसांपूर्वी कुनो पार्कमध्ये मादी चित्ता साशा हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता उदय या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (23 एप्रिल) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चित्ता उदय मान खाली घालून जमिनीवर पडलेला दिसून आला. त्याच्याजवळ गेल्यानंतर तो लंगडत चालताना दिसला. त्यानंतर याची सूचना वन्यप्राणी चिकित्सकांना देण्यात आली. त्यानंतर उदयची तपासणी केल्यानंतर तो आजारी असल्याचे दिसून आले. उदयला उपचारासाठी ट्रॅकुलाइज केलं. त्यानंतर बेशुद्ध करुन त्याच्यावर उपचार सुरु केले होते. मात्र, उदयची प्रकृती पाहून त्याला पुढील उपाचर आणि निरीक्षणासाठी आयसोलेशन वार्डात ठेवलं होतं. मात्र रविवारी चार वाजण्याच्या सुमारास उदयचा मृत्यू झाला.


 






 मृत्यू नेमका कशामुळं हे शवविच्छेदन अहवालानंतर समजणार


दरम्यान, उदय या चित्त्याचा मृत्यू  नेमका कशामुळं झाला याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याबाबतची माहिती मिळू शकेल असे प्रधान मुख्य वनसंरक्षक जे. एस. चौहान यांनी सांगितलं. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या 20 चित्त्यांपैकी आता 18 चित्ते उरले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आठ चित्त्यांना गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होतं. यातील दोन चित्त्यांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. 


2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने नामिबियातून चित्ता आणण्यास हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर विशेष विमानाने हे आठ चित्ते भारतात दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नामिबियामधून आणलेले चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उपस्थित होते. हे सर्व चित्ते आपल्या नव्या घरी रुळले होते. हे चित्ते शिकारदेखील व्यवस्थितपणे करत होते.  फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेहून 12 चित्ते आणण्यात आले. यामध्ये 7 नर आणि 5 मादी चित्त्यांचा समावेश आहे. त्यांनादेखील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहे. मात्र, यातील दोन चित्त्यांचा आता मृत्यू झाला आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Namibian Cheetah Sasha : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसादिवशी नामिबियातून आणलेल्या चित्त्याचा मृत्यू