कोलकाता : कोलकात्यामधील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ डॉक्टरांवर जमावाने हल्ला केल्यानंतर पश्चिम बंगालमधील कनिष्ठ डॉक्टरांनी आंदोलन छेडले आहे. सुरुवातीला केवळ कोलकात्यापर्यंत मर्यादित असलेल्या या आंदोलानाने एव्हाना देश व्यापला आहे. प्रामुख्याने कोलकाता, मुंबई आणि दिल्लीत मोठी आंदोलनं सुरु आहेत.


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना आंदोलन थांबवण्यास सांगितले होते. ममता यांनी डॉक्टरांना तसा अल्टीमेटम दिला होता. परंतु ममतांच्या अल्टीमेटमला न जुमानता डॉक्टरांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे.

केवळ पश्चिम बंगालमध्येच नव्हे तर नवी दिल्ली आणि मुंबईतही सरकारी डॉक्टरांनी रुग्णालयातील कामांवर बहिष्कार घातला आहे. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी डोक्यावर पट्टी बंधून सरकारचा निषेध करत काम केले.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सनीदेखील (एमआरडी) या आंदोलनाचे समर्थन केले आहे. एमआरडीच्या केंद्रीय अध्यक्षा डॉ. कल्याणी डोंगरे याबाबत म्हणाल्या की, "पश्चिम बंगालमधील कनिष्ठ डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात 4 हजार 500 डॉक्टरांनी कामकाज बंद ठेवले आहे."

एमएआरडीचे अध्यक्ष प्रशांत चौधरी याबाबत म्हणाले की, "पश्चिम बंगालमध्ये जमावाने ड्युटीवर असलेल्या डॉक्टरवर हल्ला केला. अशा प्रकारे डॉक्टरांना लक्ष्य केल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज आम्ही या हल्ल्याच्या विरोधात मूक आंदोलन करुन विरोध दर्शवणार आहोत."

दरम्यान शुक्रवारी दिल्लीतल्या सरकारी डॉक्टरांनी ओपीडीसह रुटीन सर्जरी विभागाकडे न पाहण्याचा निर्णय घेतला आहे. एम्स आणि सफदरगंज रुग्णालयात ओपीडी विभाग पूर्णपणे बंद आहे.

दिल्ली मेडिकल असोसिएशनचे (डीएमए) अध्यक्ष डॉ. गिरीश त्यागी याबाबत म्हणाले की, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. राज्यात डिएमएशी संबंधित 18 हजार डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यंविरोधात ताबडतोब अॅक्शन घेण्यासाठी एक कायदा करण्याची आवश्यकता आहे. या कायद्याअन्वये अशा प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देता येईल.

राज्यातील निवासी तसेच इंटर्न डॉक्टरांचे आज आंदोलन, कोलकात्यात डॉक्टरांना मारहाणीच्या घटनेचा निषेध