जवळपास 20 टन इतके वजन असलेल्या या स्पेस स्टेशनमध्ये भारत मायक्रोग्रॅव्हिटीशी संबंधित प्रयोग करु शकणार आहे. या स्पेस स्टेशनमुळे भारतातील अंतराळ प्रवासी 15 ते 20 दिवस अंतराळात राहू शकतात. मिशन गगनयाननंतर या स्पेस स्टेशनबाबतची अधिक माहिती देण्यात येईल असेही इस्रोने आज स्पष्ट केले.
दरम्यान, इस्रोकडून सांगण्यात आले आहे की, "हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भारत इतर कोणत्याही देशाची मदत घेणार नाही. सध्याच्या घडीला केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांकडे स्वतःचे स्पेस स्टेशन आहे. जगभरातील उर्वरीत सर्व देश अंतराळातील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्राचा वापर करतात. भारताचे स्पेस स्टेशन हा मिशन गगनयानचाच एक भाग आहे."
व्हिडीओ पाहा
के. सिवन यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सिवन यांनी सांगितले की, "ह्यूमन स्पेस मिशन लॉन्च केल्यानंतर आम्ही गगनयान प्रकल्प हाती घेणार आहोत. त्यासोबतच भारत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन उभारणार आहे."
केंद्र सरकारने यापूर्वीच मिशन गगनयानसाठी 10 हजार कोटी रुपयांचे बजेट जारी केले आहे. 2022 मध्ये भारत मानवासह एक यान आंतराळात पाठवणार आहे. त्यापूर्वी भारत दोन मानवरहित यान आंतराळात पाठवण्याचे प्रयोग करणार आहे.