कोलकाता : फेसबुकवर 'गूडबाय' असा मेसेज लिहून अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. संप्रित बॅनर्जी असं मृत तरुणाचं नाव आहे.
संप्रितने बुधवारी रात्री फेसबुवर 'गूडबाय' हा मेसेज पोस्ट केला. पण यानंतर तो त्याचं आयुष्य संपवेल, असं त्याच्या मित्रांनाही वाटलं नव्हतं. काही तासांनंतर म्हणजेच गुरुवारी सकाळी संप्रित त्याच्या बेडरुममधील सीलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
पोलिसांना सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे सहामाही परीक्षेतील सुमार कामगिरीमुळे दु:खी झाल्याने संप्रितने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, संप्रितने हे टोकाचं पाऊल उचलण्यामागे वर्गमित्रांसह पालकांनी शिक्षकांला जबाबदार धरलं आहे. शिक्षक कायम संप्रितला बोलत असतं, असा आरोप त्यांनी केला आहे. इतकंच नाही शिक्षक संप्रितचा संपूर्ण वर्गासमोर शारीरिक आणि मानसिक छळची करायाचे, असा आरोपही त्याच्या आईने केला आहे.
संप्रित कॉमर्सचा विद्यार्थी होता. वर्गमित्रांच्या माहितीनुसार, "परीक्षेत योग्य उत्तर लिहूनही कमी गुण का दिले, अशी विचारणा करण्यासाठी संप्रित काही दिवसांपूर्वी शिक्षकांकडे गेला होता. या प्रश्नामुळे व्यथित झालेल्या शिक्षकाने संप्रितच्या थोबाडात लगावली आणि वर्गातून जाण्यास सांगितलं. या घटनेमुळे संप्रित अतिशय दु:खी झाला होता."