लखनऊ : "ताजमहल आणि लाल किल्ल्याची शेकडो वर्षांपूर्वी निर्मिती आधी झाली नसती तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचंही श्रेय घेतलं असतं," अशा शब्दात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर निशाणा साधला.
उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या गांधी पार्कमधील एका सभेत असदुद्दीन ओवेसी बोलत होते.
"जुन्या योजना आपल्याच असल्याचं सांगून मोदी त्याचं श्रेय घेतात. खादी ग्रामोद्यगच्या कॅलेंडर आणि टेबल डायरीवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वत:चा फोटो छापून मोदींनी नरेंद्र बापू बनण्याचा प्रयत्न केला," असं म्हणत ओवेसींनी मोदींवर हल्लाबोल केला.
ओवेसी म्हणाले की, "चरखा दोन्ही हातांनी चालत, हे प्रत्येकाला माहित आहे. पण कॅलेंडर आणि डायरवरील फोटोमध्ये मोदी एकाच हाताने चरखा चालवताना दिसत आहे. सुदैवाने लाल किल्ला आणि ताजमहलचं निर्माण शेकडो वर्षांपूर्वीच झालं, नाहीतर पंतप्रधानांनी त्याचंही श्रेय घेतलं असतं."