मुंबई : सण समारंभांसाठी तयार करण्यात आलेली जाहिरात प्रदर्शित केल्यानंतर तनिष्क ज्वेलरी कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एवढंच नाहीतर हा वाद आता सोशल मीडियापर्यंत पोहोचला आहे. सोशल मीडियावर तनिष्कला ट्रोल केलं जाऊ लागलं आहे. तसेच तनिष्क बॉयकॉट करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जाऊ लागली आहे. सोमवारी ट्विटरवर संपूर्ण दिवस #BoycottTanishq हा हॅशटॅग ट्रेण्ड करत होता. त्यानंतर कंपनीने प्रदर्शित केलेली आपल्या ब्रँडची जाहीरात मागे घेतली आहे.
सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला #BoycottTanishq हॅशटॅग
कंपनीने सध्या एका पाठोपाठ येणारे सण-उत्सव लक्षात घेऊन आपल्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी गेल्या आठवड्यात एक जाहिरात प्रदर्शित केली होती. परंतु, व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या जाहीराती विरोधात मोहीम सुरु केली आणि #BoycottTanishq हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. अनेकांनी तनिष्कने प्रदर्शित केलेली जाहीरात ही लव जिहादला प्रोत्साहन देणारी असल्याचा दावा केला. तसेच ही जाहिरात लवकरात लवकर बंद करावी अशी मागणीही केली. दरम्यान काही युजर्स #BoycottTanishq ची मागणी करणाऱ्या लोकांवर टीका करत आहेत. तसेच त्यांचे हे विचार म्हणजे, भारताच्या विचारांविरोधातील असल्याचं सांगितलं आहे.
तनिष्कची जाहिरात का ठरली वादासाठी कारणीभूत?
दरम्यान, तनिष्कने जी जाहिरात प्रदर्शित केली होती. त्या जाहिरातीमध्ये एका हिंदू महिला दाखवण्यात आली असून त्या महिलेचं लग्न मुस्लिम कुटुंबात होतं. व्हिडीओमध्ये महिलेच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरु आहे. यादरम्यान मुस्लिम कुटुंबिय हिंदू प्रथेनुसार, आपल्या सुनेचं डोहाळे जेवण करताना दाखवलं आहे. व्हिडीओच्या शेवटी गरोदर महिला आपल्या सासूला विचारते की, 'आई ही प्रथा तुमच्या घरात तर होत नाही ना?' यावर तिची सासू म्हणते की, 'मुलींना खूश करण्याची प्रथा तर सगळ्याच घरांमध्ये असते ना?'
तनिष्कच्या या जाहिरातीमध्ये हिंदू-मुस्लिम एकता दाखवणाचा प्रयत्न या जाहीरातीतून करण्यात आला आहे. परंतु, ही जाहिरात अनेक लोकांना अजिबात आवडली नाही. त्यांनी ही जाहिरात लव जिहादला प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप केला आणि ट्रोल करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता तनिष्कची नवी जाहिरात सोशल मीडियावर वादाचा विषय बनली आणि नेटकरी या जाहिरातीच्या बाजूने आणि विरोधात बोलू लागले. तर अनेकांनी तनिष्क कंपनीचे दागिने विकत घेणार नसल्याचं सांगत या ब्रँडला बायकॉट करण्याची मागणी सुरु केली. ट्विटरवर लोकांनी जाहिरातीसंदर्भात वेगवेगळ्या पोस्ट, कमेंट करत आपल्या प्रतिक्रीया दिल्या.
कांग्रेस नेते शशी थरूर यांनी देखील केलं ट्वीट
ट्रोल होणाऱ्या तनिष्कच्या जाहिरातीसंदर्भात काँग्रेस नेते शशि थरूर यांनीही एक ट्वीट केलं आहे. त्यांनी यासर्व प्रकारासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, 'अच्छा तर हिंदुत्व ब्रिगेडने हिंदू-मुस्लिम एकतेला सुंदर पद्धतीने सादर करण्यात आलेल्या या जाहिरातीमुळे तनिष्क ज्वेलरी बायकॉट करण्याची मागणी केली जात आहे. जर हिंदू-मुस्लिम यांच्यातील 'एकत्वम' संदर्भात त्यांना एवढाच त्रास असेल तर संपूर्ण जगभरात हिंदू-मुस्लिम यांच्यातील ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या भारतालाच बायकॉट का नाही करत?
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु संघवी यांनीही ट्वीच करत तनिष्कच्या जाहीरातीचं समर्थन केलं आहे. तसेच बायकॉट करण्याची मागणी करणाऱ्यांवर टीकाही केली. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी सदस्य शमीना शफीक यांनीही या जाहिरातीची बाजू घेतली आहे. त्यांनी ट्वीट केलं की, 'थँक्यू डियर ट्रोलर्स, या सुंदर जाहीरातीकडे आमचं लक्षं वेधल्या बद्दल'
महत्त्वाच्या बातम्या :
प्रसुतीनंतर केवळ 14 दिवसात कर्तव्यावर हजर, बाळाला घेऊनच IAS सौम्या पांडे यांचं काम सुरु!