गाझियाबाद : आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगरच्या उप विभागीय दंडाधिकारी सौम्या पांडे यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर केवळ चौदाव्या दिवशी पुन्हा कामावर हजर झाल्या आणि समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला.
कोरोनाच्या संकटात युवा महिला अधिकारी सौम्या पांडे यांच्याकडे कोविडची जबाबदारी होती. ती जबाबदारी ओळखून त्यांनी प्रसुतीच्या काळात केवळ 22 दिवस सुट्टी घेऊन पुन्हा कामावर हजर झाल्या. जे काम पार पाडण्यासाठी माझी नियुक्ती करण्यात आली आहे, त्याला न्याय देणे हे मी माझे कर्तव्य समजते, असं त्या म्हणाल्या.
एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबत सांगताना त्या म्हणाल्या की, "मी एक आयएएस अधिकारी आहे. कोरोनाच्या संकटामुळे माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे. देवाने महिलांना अपत्यांना जन्म देण्याची आणि त्यांची काळजी घेण्याचे वरदान दिले आहे. ग्रामीण भागात प्रसुतीच्या काळात आणि त्यानंतरही महिलांना घरची काम करावं लागतात, तसंच त्यांना त्यांच्या लहान मुलाकडेही लक्ष द्यावं लागतं. मला माझ्या तीन आठवड्याच्या मुलीसह प्रशासनातील माझे कर्तव्य पार पाडता येतं हा देवाने दिलेला आशीर्वाद समजते."
"गाझियाबाद जिल्हा प्रशासन आणि तहसील भाग हे माझे कुटुंब आहे. माझ्या या कुटुंबाने मला प्रसुतीच्या काळात खूप मदत केली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील सहकाऱ्यांनीही मदत केली" असेही त्या म्हणाल्या.
राज्यात कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी संपूर्ण राज्यातील अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. अशा वेळी मला मागे राहून चालणार नाही. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मी कामावर पुन्हा हजर झाले असे त्या म्हणाल्या.
मुळच्या प्रयागनगरच्या असलेल्या सौम्या पांडे या 2017 सालच्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. संपूर्ण देशात त्या चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी चांगले काम करुन प्रशासनावर आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक अनेकांनी केले.
आताही केवळ 14 दिवसांच्या मुलीला घेऊन त्या कार्यालयात उपस्थित राहतात. तिची काळजी घेतच त्या त्यांचे काम सुरु असते. त्यासाठी प्रत्येकवेळी समोरील फाईल्स त्या सॅनिटाइज्ड करत असतात. घरी गेल्यानंतरही त्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेत असतात. त्यांचा याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
कोरोनाच्या काळात प्रत्येक गर्भवती महिलांनी आवश्यक काळजी घेतली पाहिजे असाही त्यांनी संदेश दिला.
या आधीही 2013 सालच्या आयएएस बॅचच्या महिला अधिकारी आणि सध्या आंध्र प्रदेशातील ग्रेटर विशाखापट्टनम महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या श्रीजना गुम्माला याही त्यांच्या केवळ महिनाभराच्या बाळाला घेऊन आपल्या कार्यालयात येऊन कामाला सुरुवात केली होती.