MeToo Movement : सोशल मीडियावर #MeToo नावाने एक मोहिम सुरु आहे. या मोहिमेच्या माध्यमातून महिला त्यांच्यासोबतचं गैरवर्तन किंवा त्यांना सामना कराव्या लैंगिक अत्याचाराबाबत बोलत आहेत. कामाच्या ठिकाणी किंवा परिस्थितीचा फायदा घेऊन महिलांचं कसं शोषण केलं जातं, हे या माध्यमातून सांगण्यात येत आहे. जगभरातील अनेक महिला कलाकारांनी #MeToo मोहिमेंतर्गत आपले अनुभव शेअर केले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वादानंतर ही मोहिम चर्चेत आली. आता दिग्दर्शक विकास बहलवर एका महिलेच्या लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर या मोहिमेने आणखी जोर पकडला आहे.


विविध कारणांमुळे आतापर्यंत आपल्यासोबतच्या वाईट अनुभवांची कुठेही वाच्यता न केलेल्या महिलाही आता खुलून बोलत आहेत. ज्या पुरुषांनी महिलांसोबत गैरवर्तन केलं आहे, त्यांच्या मनात #MeToo मुळे भीती भरली आहे. या मोहिमेतून न्याय मिळण्याबाबत काही स्पष्ट नसलं तरी महिला आता लैंगिक अत्याचार सहन करणार नाहीत, असा कडक संदेश मिळालाय. कोणताही पुरुष कामाच्या ठिकाणी महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेण्याअगोदर आता दहा वेळा विचार केल्याशिवाय राहणार नाही.

#MeToo हे प्रकरण जगात नवीन नाही. भारतात #MeToo मोहिमेने आत्ता जोर धरला असला तरी याची सुरुवात हॉलीवूडमधून झाली होती.

सोशल मीडियावर #MeToo ची सर्वात अगोदर सुरुवात प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री एलिसा मिलानोने केली होती. हॉलीवूड सिनेनिर्माता हार्वे विंस्टीनने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला होता. मिलानोने तिच्या ट्विटर अकाऊंटवर 16 ऑक्टोबर 2017 रोजी एक ट्वीट केलं होतं, ज्यामध्ये लिहिलेलं होतं, की “तुम्हीही लैंगिक अत्याचाराचा सामना केला असेल तर माझ्या ट्वीटला #MeToo ने रिप्लाय करा.”

मिलानोच्या या ट्वीटनंतर अनेक महिला कलाकारांनी आपले अनुभव शेअर केले आणि ही एक जागतिक स्तरावरची मोहिम बनली.

हॉलीवूडमधील लैंगिक अत्याचार एक गंभीर समस्या

#MeToo मोहिमेला जगभरात आणण्याचं काम एलिसा मिलानोने केलं हे कुणीही नाकारु शकत नाही. मिलानोने हार्वे विंस्टीनवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर त्याच्यावर आणखी काही अभिनेत्रींनीही हाच आरोप केला. ज्यामध्ये अँजेलिना जोली, हेदर ग्राहम आणि अॅश्ले जद यांचाही समावेश होता. दिग्दर्शकाने करिअरच्या सुरुवातीला अर्धनग्न होण्यासाठी सांगितल्याचाही खुलासा एका अभिनेत्रीने केला होता.

लेडी गागा, जेनिफर लॉरेन्स, सलमा हायेक, अमेरिका फरेरा यांच्यासह अनेक दिग्गजांनी या मोहिमेचं समर्थन केलं आणि आपला अनुभव शेअर केला. हॉलीवूडमध्ये या नावाची यादी अत्यंत मोठी आहे. पण हॉलीवूडमधील या मोहिमेने जगातील इतर देशांनाही अत्याचाराविरोधात बोलण्यासाठी पुढे येण्यास बळ दिलं.

भारतात #MeToo

भारतात #MeToo ची सर्वात अगोदर सुरुवात तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ताने केली होती. यानंतर अनेक अभिनेत्रींनी या हॅशटॅगचा वापर केला आणि बिनधास्तपणे आपले अनुभव सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेत्री स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, कोंकणा सेन शर्मा, कंगना रणावत, राधिका आपटे, इशिता दत्ता, मलिका दुआ, सुचित्रा कृष्णमूर्ती, दक्षिणेतील अभिनेत्री पार्वती, चिन्मयी श्रीप्रदा, सजिता मदातिल, रिमा कलिंगल यांसारख्या महिला कलाकारांचा यामध्ये समावेश आहे.

केवळ सिनेमा क्षेत्रातील महिलाच नाही, तर इतर क्षेत्रातील महिलांनीही आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारावर मौन सोडलं. महिला पत्रकार किंवा इतर ठिकाणी काम करणाऱ्या महिलांनीही अनुभव शेअर केले.

#MeToo चा सर्वात पहिला उल्लेख

एलिसा मिलानोने #MeToo ची सुरुवात केली हेच सर्वांना माहित आहे. पण हे अर्धसत्य आहे. Me Too चा सर्वात अगोदर उल्लेख 2006 साली झाला होता. अमेरिकेतील सामाजिक कार्यकर्त्या तराना बर्के यांनी हा उल्लेख केला होता. मायस्पेस या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अमेरिकेतून Me Too ची सुरुवात करण्यात आली होती.

बर्के यांनी अशा महिलांसाठी (विशेषतः वंचित समाजातील महिला) Empowerment Through Empathy या अभियानाची सुरुवात केली होती, ज्यांचं कधी लैंगिक शोषण झालं असेल. बर्के यांनी  Me Too नावाची एक डॉक्युमेंट्री बनवली होती. बर्के यांना एका 13 वर्षाच्या मुलीने सांगितलं, की मी देखील लैंगिक अत्याचाराची बळी ठरली आहे. त्यानंतर बर्के म्हणाल्या - Me Too.

#MeToo या मोहिमेमुळे शांतपणे अत्याचार सहन करणाऱ्या महिलांना केवळ आवाजच मिळालेला नाही, तर त्यांना एक व्यासपीठ मिळालं आहे, जे बोलण्यासाठी बळ देतं. महिलांकडे केवळ उपभोगाचं साधन म्हणून पाहणाऱ्या पुरुषांच्या मनात #MeToo या मोहिमेने धडकी भरवली आहे. यामुळे महिलांच्या मनातली भीती संपली असून त्यांनी भविष्यातील पिढीसाठी एक संदेश दिला आहे.

यामध्ये एक प्रश्न असाही निर्माण होतो, की #MeToo अंतर्गत अशा महिला बोलू शकतात ज्यांच्याकडे मोबाईल आणि इंटरनेट आहे. त्या महिलांचं काय ज्या गाव-खेड्यांमध्ये आजही निमूटपणे अत्याचार सहन करतात आणि त्यांच्या आवाजाला बळ मिळण्याचं कोणतंही साधन नाही.