नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज भारत दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हिंसाचार उफाळला आहे. दिल्लीत सीएए विरोधक आणि समर्थकांमध्ये धुमश्चक्री उडाली. ट्रम्प यांचं पंतप्रधान मोदींनी अहमदाबादेत स्वागत केलं. त्यानंतर कार्यक्रम सुरु होते, तर दुसरीकडे दिल्लीत तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ सुरु होती. ट्रम्प आग्र्याला पोहोचले आणि त्यानंतर हिंसाचार आणखी वाढला. या हिंसाचार थांबवण्याच्या प्रयत्नात एका पोलिसाचा मृत्यू झाला, तर 37 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे. सध्या उत्तर-पूर्व दिल्लीच्या बऱ्याच भागांमध्ये 144 कायद्याअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.


एका ठिकाणी तर पेट्रोल पंपाला आग लावलीए. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुरांच्या कांड्याही फोडल्या. दरम्यान, ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच आंदोलनाला हिंसक वळण लागलंय का?, असा संशय व्यक्त केला जातोय. याबाबत गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांचा तपास सुरु झालाय.

आज दिवसभरात काय?
आज सकाळी सात वाजता मौजपूर चौकात लोक सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ बसले होते. तर, सकाळी दहाच्या सुमारास मौजपूर चौकापेक्षा 200 मीटर पुढे, कबीर नगर परिसरात लोक या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले. सुमारे अर्ध्या तासानंतर कबीर नगरमधील विरोधक आणि मौजपूर चौकातील समर्थक यांच्यात दगडफेक सुरु झाली.



ही दगडफेक दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होती. दरम्यान, पूर्वोत्तर भागात वेगवेगळ्या ठिकाणाहून दगडफेक व जाळपोळ केल्याच्या बातम्या येऊ लागल्या. जाफराबाद परिसरात दुपारी दोनच्या सुमारास घराला आग लावण्यात आली. तर, दुपारी अडीचच्या सुमारास भजनपुरा भागात हिंसाचाराची बातमी मिळाली. तिथं एका पेट्रोल पंपाला आग लावण्यात आली. दरम्यान, गोकलपुरीचे हेड कॉन्स्टेबल दगडफेकीत गंभीर जखमी झाले. रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.



दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डीसीपी शाहदारा अमित शर्मा जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जाफराबाद परिसरात तीनच्या सुमारास एका व्यक्तीने गोळीबार केला, त्यात एक मुलगा जखमी झाला. चार वाजता कर्डमपुरी भागात पुन्हा दगडफेक सुरु झाली. पोलिसांनी अश्रूंधुराचा मारा करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. सुमारे सहा वाजेपर्यंत हा हिंसाचार सुरु होता. सध्या शहरात तणावपूर्ण शातंता आहे.