Rameshwar Nath Kao : भारताच्या रिसर्च अॅन्ड अॅनालिसिस विंग अर्थात रॉचे पहिले प्रमुख रामेश्वर नाथ काव यांचा आज जन्मदिवस. रामेश्वर काव हे 70 च्या दशकातील जगप्रसिद्ध गुप्तहेर होते. 1971 च्या युद्धात पाकिस्तानचे दोन तुकडे करणे असो वा सिक्किमचे विलिनीकरण असो, त्या काळातील प्रत्येक गोष्टीमध्ये रामे्श्वर काव यांचा हात असल्याचं सांगितलं जातं. आज भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ आणि इन्टेलिजन्स ब्युरोची जी घडी बसली आहे ती घडी रामेश्वर काव यांनीच बसवली आहे. त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या भारतीय गुप्तचरांना 'काव बॉईज' असं म्हटलं जायचं.


रामेश्वर काव यांचा जन्म 10 मे 1918 साली वाराणसी मध्ये झाला होता. 1940 साली ते भारतीय पोलीस सेवा, त्यावेळी इंडियन पोलीस या नावाने ओळखली जायची, ती परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पोलीस सेवेमध्ये रुजू झाले. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, 1948 साली इन्टेलिजन्स ब्युरोची स्थापना करण्यात आली आणि त्याचे सहाय्यक निर्देशक म्हणून रामेश्वर काव यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांच्यावर पंतप्रधान नेहरूंच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली. 


 






'काश्मिर प्रिन्सेस' तपास
चीनच्या पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचण्याच्या घटनेचा तपास करण्याची रामेश्वर काव यांच्यावर सोपवण्यात आला होती. 1955 साली चीनचे तत्कालीन पंतप्रधान चू एन लाय हे एअर इंडियाच्या 'काश्मिर प्रिन्सेस' नावाच्या एका विमानाने बांडुंग परिषदेत भाग घेण्यासाठी हॉंगकॉंग वरुन जाणार होते. सुदैवाने त्यावेळी चीनच्या पंतप्रधानांची तब्बेत बिघडली आणि अगदी अंतिम क्षणाला त्यांनी आपला दौरा रद्द केला. या विमानाचा इंडोनेशिया जवळ अपघात झाला आणि त्यातील चीनेच्या सर्व उच्च अधिकारी आणि पत्रकारांचा मृत्यू झाला. रामनाथ काव यांनी या घटनेचा तपास केला आणि या घटनेमागे तैवानच्या गुप्तचर खात्याचा हात असल्याचा अहवाल दिला. काव यांच्या या तपासावर चीनचे पंतप्रधान खुश झाले आणि काव यांना वैयक्तीक भेटीसाठी बोलावलं.


'रॉ' ची स्थापना आणि काव यांच्याकडे जबाबदारी
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमेरिकेच्या सीआयए आणि ब्रिटनच्या एमआय 6 या गुप्तचर खात्याच्या धर्तीवर भारतातही 1968 साली रॉ ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. रॉचे पहिले प्रमुख म्हणून रामेश्वर काव यांची नियुक्ती करण्यात आली. आपली नियुक्ती योग्य आहे हे सिद्ध करण्याची संधी काव यांना दोनच वर्षात मिळाली.


पाकिस्तानचे दोन तुकडे
पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याच्या बांग्लादेशमध्ये स्वातंत्र्याची चळवळ सुरु झाली होती. 1970 साली काव यांनी याचा फायदा घेतला आणि बांग्लादेश मुक्ती वाहिनीच्या एक लाखांहून अधिक जवानांना सैनिकी प्रशिक्षण दिलं. राव यांचे गुप्तचरांचे जाळे इतकं मजबूत होतं की त्यांना पाकिस्तान भारतावर कधी हल्ला करणार आहे याची तंतोतंत माहिती होती. त्या माहितीच्या आधारेच भारताने 1971 च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केला आणि त्याचे दोन तुकडे केले. 


सिक्किमचे विलिनीकरण
रामेश्वक काव यांचं आणखी एक महत्वाचं काम म्हणजे सिक्किमचे भारतात विलिनीकरण. केवळ चार अधिकाऱ्यांच्या मदतीने रामेश्वर काव यांनी सिक्किमच्या विलिनीकरणाची मोहिम फत्ते केली. याची जगभरातील कोणत्याच गुप्तचर खात्यांना जराही माहिती लागू दिली नव्हती. खासकरुन सीआयएला. अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएला या भागात जास्तच इंटरेस्ट होता. त्यांच्या नाकावर टिच्चून 1975 साली सिक्किमचे भारतात विलिनीकरण करण्यात आलं. 


रामेश्वर काव यांनी जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तीन पंतप्रधानांसोबत काम केलं. त्यांच्यासोबत काम केलेले रॉचे माजी अधिकारी आर. के. यादव यांनी काव यांच्या जीवनावर आधारित  'मिशन रॉ' नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. यादव सांगतात की, काव हे गुप्त माहिती गोळा करण्यामध्ये महारथी होते.


पंजाबमध्ये 1980 च्या काळात खलिस्तानी दहशतवाद वाढीस लागला. त्यावेळी काव यांच्या सूचनेनुसार, देशांतर्गत दहशतवाद्यांशी लढण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डची निर्मिती करण्यात आली. 


सार्वजिनिक जीवनापासून अलिप्त
रॉ मधून निवृत्त झाल्यानंतर रामेश्वर काव हे दिल्लीतील आपल्या निवासस्थानी राहत होते. त्यांचे निवासस्थान नेमकं कुठं आहे हे अनेकांना माहिती नव्हतं. असंही सांगितलं जातं की रामेश्वर काव हे कसे दिसतात याची माहितीही बहुतेकांना नव्हती. सार्वजनिक जीवनापासून काव हे नेहमीच बाजूला राहिले. आयुष्यात दोन वेळाच या माणसाचा फोटो काढण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. भारतीय गुप्तचर संघटनेचा काव यांच्या कार्यकालात दक्षिण आशिया तसेच पश्चिम आशियात दरारा होता, तो आजही आहे. त्या काळात रामेश्वर काव यांच्या 'काव बॉईज' नी जगभर उचापती केल्या, धुमाकुळ घातल्याची चर्चा आजही खुमासदार पद्धतीने सांगण्यात येते. अशा या जगप्रसिद्ध गुप्तचराचा मृत्यू 2002 साली झाला. तरीही ज्या-ज्या वेळी रॉ च्या कर्तृत्वाबद्दल चर्चा होते, त्या-त्या वेळी रामेश्वर नाथ काव यांच्या नावाचीही चर्चा हमखास होते. 


महत्वाच्या बातम्या :