Weather Update: भारतीय हवामान खात्यानं 11 मे ते 13 मे या काळात देशाच्या पश्चिम हिमालय क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याचे परिणाम देशातील इतरही भागांत दिसणार आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रातून येणाऱ्या घोंगावणाऱ्या वाऱ्यामुळं पश्चिम भारतात पावसाची शक्यता आहे. 12, 13 मे या दिवशी हिमाचल, उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो.
सोमवारी दिल्लीत हलक्या पावसाची शक्यता आहे. 12,13 आणि 14 मे रोजी राजस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्येही सोमवार आणि मंगळवारी हवामानात बदल होऊ शकतात. जम्मू काश्मीरमघ्ये बुधवारी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशाची राजधानी, दिल्लीमध्ये पाऊस होण्यासोबतच गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या उष्णतेपासून नागरिकांना काही अंशी दिलासा मिळू शकतो. रविवारी उत्तराखंड, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मेघालय, आसाम, मणिपूर, मिझोरम आणि नागालँडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर, राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहारच्या पूर्व भागातही हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.
रविवारी झालेल्या पावसानंतर सोमवारी हवामानात अचानकच काही बदल झाल्याचं आढळलं. सोमवारी, पाटणा येथे काळ्या ढगांची दाटी पाहायला मिळाली. काही भागांत धुळीचे लोटही पाहायला मिळाले.