Merry Christmas 2020 : कोरोनाच्या काळात देशभर ख्रिसमसचा उत्साह आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा हा नाताळाचा सण उत्साहात पण अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. या सणानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विटरद्वारे जनतेला शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, 'ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! मी आशा करतो की हा सण शांती आणि समृद्धीचा प्रसार करत समाजात सौहार्द वाढवेल. चला आपण येशूच्या प्रेम, करुणा आणि परोपकारी शिकवणींचं अनुसरण करुयात. तसेच समाज आणि राष्ट्रहितासाठी संकल्पबद्ध राहुयात.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन देशवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'मेरी ख्रिसमस! प्रभू ख्रिस्ताचे जीवन आणि तत्त्वं जगभरातील कोट्यवधी लोकांना सामर्थ्य देतात. ख्रिस्ताचा मार्ग सर्वांना न्याय्य आणि सर्वसमावेशक समाज घडविण्याचा मार्ग दाखवत राहिल. प्रत्येकानं आनंदी आणि निरोगी राहावं'.
नाताळनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा
नाताळनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी येशू ख्रिस्तांच्या प्रेम, करूणा आणि क्षमा या तत्वांचे आचरण करायला हवे असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. नाताळ हा प्रेम आणि आपुलकीचा संदेश देणारा सण आहे. येशु ख्रिस्तांची शिकवण ही माणसातल्या देवत्वाला मानणारी असून त्यांनी करूणामयी, क्षमाशील आणि प्रेमळ मार्गाने जीवन जगण्याचा संदेश दिला. त्यांची हीच शिकवण आजही आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचे सांगून येशूंचा मानवतावादी दृष्टीकोन अंगिकारल्यास समाजात शांतता आणि सौहार्द निर्माण होईल असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता साधेपणाने ख्रिसमस साजरा करावा. कोरानासंदर्भात घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शुभेच्छा देताना ट्वीट करत म्हटलं आहे की, प्रभू येशूने मानवांना दाखवलेला प्रेम, शांती आणि बंधुतेचा मार्ग कायम प्रकाशमान राहो ही सदिच्छा. आपणांस व आपल्या परिवारास नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
सण साजरा करताना कोरोना नियमांचे पालन करा: उपमुख्यमंत्री अजित पवार
येशू ख्रिस्तांनी जगाला दया, क्षमा, शांती, परोपकाराचा संदेश दिला. संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणासाठी काम केले. येशूंच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समाधान, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणतात की, नाताळचा सण सर्वत्र आनंद, चैतन्य, उत्साहाचे वातावरण घेऊन येतो. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा नाताळ यंदाही उत्साहात साजरा करायचा आहे, परंतु सण साजरा करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे व सुरक्षिततेचे पालन केले पाहिजे. स्वत:चे, कुटुंबाचे, समाजाचे कोरोनापासून संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, ती पार पाडूया, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.