रांची : रक्तदात्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी झारखंड सरकारने नामी शक्कल लढवली आहे. रक्तदान करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना चार दिवसांची सुट्टी (सीएल) देण्यात येईल, अशी घोषणा झारखंड सरकारने केली.
सु्ट्टीचं आमिष दाखवल्यामुळे रक्तदात्यांमध्ये लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त काल झारखंड सरकारने ही घोषणा केली.
झारखंडमध्ये दरवर्षी साडेतीन लाख युनिट रक्ताची गरज लागते. मात्र राज्यात केवळ 19 हजार युनिट रक्ताचंच संकलन होतं.
राज्याच्या आरोग्य, शिक्षण आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रक्तदानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी रक्तदानाच्या बदल्यात चार दिवसांची सुट्टी मंजूर करण्याचा निर्णय घेतला. 1 ऑक्टोबरला रक्तदान शिबिरादरम्यान 775 युनिट्स रक्त संकलन झाल्याची माहिती आहे.