kharif season : सरकारनं चालू खरीप हंगामात 521.27 लाख टन तांदूळ खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे प्रमाण मागील वर्षीपेक्षा अधिक ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी खरीप हंगामात 496 लाख टन तांदूळ खरेदी करण्यात आली होती. खरीप (उन्हाळी-पेरणी) आणि रब्बी (हिवाळी-पेरणी) या दोन्ही हंगामात भात पीक घेतले जाते.
ऑक्टोबर-सप्टेंबर या कालावधीत येणाऱ्या खरीप विपणन हंगाम (KMS) 2023-24 खरीप पिकाच्या खरेदी व्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी राज्याचे अन्न सचिव आणि भारतीय अन्न महामंडळ (FCI) यांची बैठक घेतली. आगामी 2023-24 च्या खरीप पीक हंगामात दरम्यान 521.27 लाख टन तांदूळ खरेदीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मागील वर्षीच्या 518 लाख टनांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, मागील वर्षी 496 लाख टन प्रत्यक्षात तांदळाची खरेदी करण्यात आली. अन्न मंत्रालयानं याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.
कोणत्या राज्यात किती तांदूळ खरेदीचं उद्दीष्ट
केंद्रीय अन्न मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये 122 लाख टन, छत्तीसगडमध्ये 61 लाख टन, तेलंगणा 50 लाख टन, ओडिशा 44.28 लाख टन, उत्तर प्रदेश 44 लाख टन तांदूळ खरेदीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हरियाणामध्ये 40 लाख टन, मध्य प्रदेशमध्ये 34 लाख टन, बिहारमध्ये 30 लाख टन, आंध्र प्रदेश 25 लाख टन, पश्चिम बंगालमध्ये 24 लाख टन आणि तामिळनाडूत 15 लाख टन तांदूळ खरेदीचं उद्दीष्ट आहे. दरम्यान, 203-24 मध्ये राज्यांकडून 33.09 लाख टन भरड धान्य खरेदीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2022-23 च्या तुलेनेत यावर्षी खरेदीत मोठी वाढ करण्यात येणार आहे.
यावर्षी देशात भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ
देशात यावर्षी भात लागवडीच्या (Paddy sowing) क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयानं (Ministry of Agriculture) दिलेल्या माहितीनुसार भात लागवड क्षेत्रात पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. आत्तापर्यंत देशात 328.22 लाख हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत देशात 312.80 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. तर या खरीप हंगामात 11 ऑगस्टपर्यंत कडधान्य, तेलबिया, कापूस आणि ताग यांच्या लागवडीत घट झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे.
आसाम, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये भात लागवड क्षेत्रात घट
मागील वर्षीचा विचार करता यावर्षी देशात भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही राज्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत कमी लागवड झाली आहे. कमी लागवड झालेल्या राज्यांमध्ये ओडिशा, आंध्र प्रदेश आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. या खरीप हंगामात आतापर्यंत ओडिशात 18.97 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी झाली आहे. जी मागील वर्षी याच हंगामात 20.356 लाख हेक्टर होती. त्याचप्रमाणे, आंध्र प्रदेशात यावर्षी 6.86 लाख हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 8.28 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी झाली होती. तर आसाममध्येही यावर्षी 14.92 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 16.25 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. भरड तृणधान्य क्षेत्राच्या लागवडीच किरकोळ वाढ झाली आहे. खरीप हंगामात आतापर्यंत लागवडीखालील क्षेत्र हे 171.36 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. जे मागील वर्षीच्या याच हंगामात 167.73 लाख हेक्टर होते.
महत्त्वाच्या बातम्या: