Vladimir Putin On Chandrayaan 3 Land : भारताच्या मिशन चांद्रयान-3 ने (Chandrayaan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरून इतिहास रचला आहे. यासह चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला आहे. याच निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देखील भारताचं कौतुक केलं आहे. पुतिन यांनी म्हटले आहे की, ही ऐतिहासिक घटना वैज्ञानिक-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या प्रभावी प्रगतीचा पुरावा आहे.
क्रेमलिनच्या प्रेस सेवेने सांगितले की, भारतीय अंतराळ संशोधन चांद्रयान-3 चे चंद्रावर त्याच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी लँडिंग केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.
"दक्षिण ध्रुवाजवळील चंद्रावर भारताच्या चांद्रयान-3 अंतराळ संशोधनाच्या यशस्वी लँडिंगबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. अवकाशाच्या संशोधनातील ही एक मोठी प्रगती आहे आणि अर्थातच, भारताने विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये केलेल्या प्रभावी प्रगतीचा हा पुरावा आहे,” असं पुतिन यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
अमेरिका आणि युरोपनेही केले अभिनंदन
अमेरिका आणि युरोपच्या अवकाश संस्थांनीही भारताचे अभिनंदन केले. यूएस स्पेस एजन्सी नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर लिहिले, "चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग केल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन! चंद्रावर अंतराळयान यशस्वीपणे सॉफ्ट-लँड करणारा चौथा देश ठरल्याबद्दल भारताचं अभिनंदन. या मिशनमध्ये तुमचा भागीदार असल्याचा आम्हाला आनंद होत आहे.
युरोपियन स्पेस एजन्सीचे महासंचालक जोसेफ एश्बॅकर यांनी 'X' वर लिहिले, "अविश्वसनीय! इस्रो आणि भारतातील सर्व जनतेचे अभिनंदन!!' त्यांनी लिहिले, “नवीन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करून भारताने दुसऱ्या खगोलीय ध्रुवावर पहिले सॉफ्ट लँडिंग केले. मी पूर्णपणे प्रभावित झालो आहे. ” ब्रिटनच्या स्पेस एजन्सीने 'X' वर लिहिले, 'इतिहास घडतो! इस्रोचे अभिनंदन.
'या' देशांनी केले प्रयत्न
मागील चार वर्षात जगातील चार देशांनी चंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भारत, इस्रायल, जपान आणि रशिया या देशांचा समावेश आहे. भारताची चांद्रयान-2 मोहिम, इस्रायलची बेरेशीट मोहिम, जपानचं हकुटो-आर आणि रशिया लुना-25 यान चंद्रावर पोहोचण्यात अयशस्वी ठरलं. या सर्व देशांना चंद्रमोहिमेत अपयशाला सामोरं जावं लागलं. विशेष म्हणजे चारही देशाची मोहिम नेमकी चंद्रावरील लँडिंग आधी अपयशी ठरली. लँडिंगच्या अंतिम प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणीमुळे या मोहिमा अयशस्वी ठरल्या.
महत्त्वाच्या बातम्या :
ISRO Mission Aditya : चंद्रानंतर आता मिशन आदित्य...काही दिवसांत इस्रो लाँच करणार 'आदित्य एल-1'