Chandrayaan 3: भारताच्या मिशन चांद्रयान-3 ने (Chandrayaan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरून इतिहास रचला आहे. यासह चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला आहे. इस्रोच्या या यशाबद्दल भारतात जल्लोषाचं वातावरण आहे. या यशाबद्दल जगभरातील अंतराळ संस्था भारताचं अभिनंदन करत आहेत.
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने ट्विट करून या यशाबद्दल भारताचं अभिनंदन केलं आहे. नासाने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 उतरल्याबद्दल इस्रोचं अभिनंदन आणि चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनल्याबद्दल भारताचं अभिनंदन. या मिशनमध्ये तुमचा भागीदार बनून आम्हाला आनंद होत आहे.
नासाच्या डीप स्पेस मिशननेही ट्विट करून भारताचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, 'अभिनंदन. चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीपणे उतरले आहे. अप्रतिम कार्य इस्रो... भारताचा अभिमान आहे.'
युरोपियन स्पेस एजन्सीनेही ट्विट करून या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारताचं अभिनंदन केलं आहे. एजन्सीने म्हटलं की, 'इस्रो आणि चांद्रयान-3 च्या टीमचं अभिनंदन.'
युरोपियन स्पेस एजन्सीच्या महासंचालकांनीही एक ट्विट केलं आहे ज्यात त्यांनी म्हटलं, 'अद्वितीय.. इस्रो, चांद्रयान 3 आणि भारतातील सर्व जनतेचे अभिनंदन. नवीन तंत्रज्ञान दाखवण्याचा हा चांगला मार्ग आहे आणि चंद्रावरील भारताचं पहिलं सॉफ्ट लँडिंग आहे.
त्यांनी पुढे लिहिलं, 'शाब्बास, मी पूर्णपणे प्रभावित झालो आहे. आम्ही यातून खूप चांगले धडे देखील घेतले आणि यातून आम्ही मौल्यवान कौशल्यं शिकत आहोत.
हेही वाचा: