नवी दिल्ली : खालिस्तानची मागणी करणाऱ्या दहशतवादी संघटना 'शीख फॉर जस्टिस'ने स्वातंत्र दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकावणाऱ्याला बक्षीसाची घोषणा केली आहे. बक्षीसाची रक्कम 125,000 डॉलर एवढी ठेवण्यात आली आहे. शीख फॉर जस्टिसच्या या इशाऱ्यानंतर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.


इंटेलिजन्स एजन्सी आयबीला माहिती मिळाली आहे की, खालिस्तान आंदोलनाला पुन्हा सक्रिय करण्यासाठी काही लोक काम करत आहेत. खलिस्तान आंदोलनाला अधिक सक्रिय करण्यासाठी 14, 15 आणि 16 ऑगस्टला लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर  केली जात आहे. आणि जो असं करेल त्याला बक्षीस देण्याची ही घोषणा या पोस्टमध्ये करण्यात आली आहे.


अमेरिकेत राहत असलेल्या अॅडवोकेट गुरुपतवंत सिंह पन्नू जो SFJ फोरमचा लीगल ॲडव्हायझर सुद्धा आहे. त्याने युट्यूबवर "शीख फॉर जस्टीस" या नावाने व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खालिस्तानचा झेंडा फडकवण्याचं आवाहन केले आहे. तसेच जो व्यक्ती झेंडा फडकवेल त्याला 1.25 लाख अमेरिकी डॉलर रक्कम बक्षीस स्वरूपात देण्याचं ही म्हटलं आहे.



74व्या स्वातंत्र्यदिनावर कोरोनाचं सावट
15 ऑगस्टला दिल्लीत होणाऱ्या मुख्य समारंभावर कोरोनाचं देखील सावट आहे. सगळ्या देशाचं लक्ष लाल किल्ल्यावर होणाऱ्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाकडे लागलेलं आहे. कोरोनामुळे अडथळा येऊ नये म्हणून अतिशय काळजी घेण्यात येत आहे. ‘गार्ड ऑफ ऑनर’ देणाऱ्या 350 पोलिसांचं संचालन यंदा होणार नाही. तसंच मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार नाहीत. यावेळी केवळ ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि पंतप्रधानांचं भाषण होणार आहे.