पलक्कड : प्रेमासाठी वाट्टेल ते करणाऱ्या प्रेमवीरांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. अशाच एका प्रेमवीराने आपल्या प्रेयसीला तब्बल 10 वर्षे आपल्या घरात लपवून ठेवले, आणि विशेष म्हणजे याची त्या दोघांच्याही कुटुंबाला जराही माहिती नव्हती. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील अईलूर या गावातील ही घटना आहे. 10 वर्षापासून संबंधित मुलगी गायब झाल्याची माहिती सगळ्या गावाला होती. पण केवळ 500 मीटर अंतरावरील प्रियकराच्या घरात लपून बसलीय याची माहिती कुणालाच लागू शकली नाही. 


'मी माझ्या प्रेयसीला 10 वर्षापासून माझ्या घरी, माझ्या कुटुंबाला माहिती न होऊ देता कसं काय लपवून ठेवलं, ते कसं काय शक्य झालं ते मलाच समजलं नाही. पण मी हे करु शकलो'. असं त्या 34 वर्षीय प्रियकराने पोलिसांना सांगितलं. रहमान आणि साजिता असं या जोडप्याचं नाव आहे. 


मुलगी दहा वर्षापूर्वी गायब
पोलिसांनी सांगितलं की, फेब्रुवारी 2010 साली पलक्कड जिल्ह्यातील नेमारा या पोलीस स्थानकात साजिता ही मुलगी गायब असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी त्या मुलीचे वय हे 18 वर्षे होतं. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. आता दहा वर्षानंतर उघडकीस आलं आहे की, साजिता आणि रहमान यांचे प्रेमप्रकरण सुरु होतं आणि साजिता रहमानच्या घरीच रहायला होती. गायब झालेल्या साजिताचं घर हे रहमानच्या घरापासून केवळ 500 मीटर अंतरावर आहे हे विशेष. 


गेली दहा वर्षे रहमान आणि साजिता हे रहमानच्या घरी, त्याच्या खोलीत राहत होते. रहमानची खोली ही दिवसभर बंद असायची. साजिताला ज्या काही गरजेच्या वस्तू लागायच्या त्या रहमान तिला द्यायचा. तीन महिन्यांपूर्वी हे दोघेही गायब झाले आणि नेमारागावच्या जवळ असणाऱ्या विथानसेरी या गावात राहू लागले. रहमानच्या एका नातेवाईकाने त्या दोघांना एकत्रित पाहिलं आणि त्याने त्याच्या कुटुंबाला आणि पोलिसांना याची माहिती दिली. 


या दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केलं आणि न्यायालयाने तडजोड म्हणून या दोघांचे लग्न लावण्याचा सल्ला दिला. पण एखाद्या मुलीला तो मुलगा दहा वर्षे, तेही त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला माहिती न देता कसं काय लपवू शकतो असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 


महत्वाच्या बातम्या :