नवी दिल्ली : दक्षिण पश्चिमेकडून आलेला मान्सून हा येत्या काही दिवसांमध्ये आणखी तीव्र स्वरुप धारण करु शकतो अशी शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. देशातील पूर्व आणि मध्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपात पाऊस बसरणार असल्याचा अंदाज वर्तवत गुरुवारपासूनच पुढच्या काही दिवसांसाठी असं चित्र कायम असेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. 


‘दक्षिण पश्चिम मान्सून आता अरबी समुद्र आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागांत अधिक सक्रिय होताना दिसणार आहे. याशिवाय गुजरातचा काही भाग आणि उर्वरित तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग आणि संपूर्ण ओडिशा तसंच पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि बिहारचा पूर्ण भाग येत्या 2- 3 दिवसांत व्यापणार आहे’, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. 


महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांमध्ये येत्या दिवसांत मान्सूनचे अधिकाधिक परिणाम दिसून येतील. 15 जूनपर्यंत महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देत हवामान खात्यानं नागरिकांना सतर्क केलं आहे. 12 ते 15 जूनदरम्यानच्या काळात कोकण किनारपट्टी आणि बहुतांश कोकणात अतीमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आयएमडीकडून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


Mumbai Rains Live Update : मुंबईसह पश्चिम उपनगरात पावसाला सुरुवात, पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद


तिथं इतर राज्यांबाबत सांगावं तर, केरळमध्ये  11 ते 15 जूनदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 10 ते 14 जूनदरम्यानच्या काळात ओडिशाच्या बहुतांश भागातही पावसाची दमदार बॅटिग असण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पावसाचा हा इशारा देत असताना स्थानिक पातळीवरही नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये आणि यंत्रणांना सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागानं मुंबई आणि लगतची उपनगरं ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.