देहरादून : उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांनी उघडण्यात आला. यानंतर पहिल्याच दिवशी हजारो भक्तांनी केदारनाथाचे दर्शन घेतलं. तसेच, केदारनाथ यात्रेनिमित्त मंदिराच्या प्रवेशद्वाराला सजवण्यात आलं आहे.


आज पहाटे 6 वाजून 10 मिनिटांनी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर राज्यपाल केके पॉल आणि विधानसभा अध्यक्ष प्रेम चंद अग्रवाल यांनी सर्वात प्रथम दर्शन घेतलं. यानंतर सर्वसामान्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला.

मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पुजाऱ्यांनी विधीवत पूजा अर्चा केली. हजारो भक्तांच्या उपस्थितीत केदारनाथाला जलाभिषेक, रुद्राभिषेक संपन्न झाला. यावेळी भक्तांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने विशेष सोय देखील केली होती. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

केदारनाथ यात्रेनिमित्त भक्तांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर अवघ्या एका दिवसात पाच हजारापेक्षा जास्त भक्तांनी केदारनाथाचे दर्शन घेतले. तर जवळपास एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असल्याची माहिती बदरीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.डी. सिंह यांनी दिली.

काय आहे केदारनाथ मंदिराचे महत्त्व?

केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग आहे. तसेच हे स्वयंभू शिवलिंग असल्याने, जगभरातून लाखो शिवभक्त केदारनाथाच्या दर्शनाला येतात. या मंदिराची निर्मिती महाभारत काळात झाल्याची भक्तांची श्रद्धा आहे. तर आठव्या शतकात आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

केदारनाथाचे मंदिर समुद्र सपाटीपासून तब्बल 3 हजार 581 मिटर उंचीवर आहे. मंदिराच्या बाहेर भगवान शंकराचे वाहन नंदी विराजमान आहेत. हे मंदिर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बंद होऊन, पुन्हा एप्रिल-मे दरम्यान भक्तांना दर्शनासाठी सुरु होते.

दरम्यान, उद्या पहाटे बद्रीनाथ मंदिराचेही दरवाजे उघडण्यात येणार आहेत. 18 एप्रिलला गंगोत्री, यमुनोत्रीपासून चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. उत्तराखंड सरकारच्या वतीनं लेझर शोचं आयोजन करण्यात आलं आहे. 4 मेपर्यंत हा लेझर शो चालू राहणार आहे.

केदारनाथ यात्रेतील यंदाची वैशिष्ट्ये

  • सात दिवसांच्या लेझर शोचं आयोजन

  • पहिल्याच आठवड्यात जवळपास पाच हजारापेक्षा जास्त भक्तांनी घेतले दर्शन

  • व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींना जीएमव्हीएनमध्ये राहण्याची व्यवस्था

  • सोनप्रयाग आणि सीतापूरमध्ये एक हजारापेक्षा जास्त वाहनांसाठी पार्किंग

  • गौरीकुंडावर हजारो भक्तांना पूजेची विशेष सोय